

उल्हासनगर : घराचा दरवाजा तोडून दोन बहिणींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन झाल्यावर थेट त्याच मुलींच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवत धमकीवजा इशारा दिल्याचा प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडला होता. या आरोपीवर उल्हासनगर पोलिसांनी आता पुन्हा नव्याने गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प २ येथील रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री २ च्या सुमारास मोठा गोंधळ उडाला होता. एका घराचा हंशू बिपिन झा, बिट्टू सिताराम यादव यांनी दरवाजा जोरात ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर त्यांना विनाकारण शिवीगाळ करत घरातील तरुणाला कानाखाली मारली. या घटनेची तक्रार करण्यासाठी तरुण आणि त्याची आई पोलीस ठाण्यात गेले असता हंशू बिपिन झा, त्याचा भाऊ रोहित झा व सोनमणी झा यांनी धारदार शस्त्रे घेऊन तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला. घरात तरुणाच्या दोन बहिणी असतानाही आरोपींनी घराचा दरवाजा तोडून घरात घुसून त्यांना घराबाहेर खेचले आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप यासंदर्भातील तक्रारीत करण्यात आला होता.
मुलींच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संतप्त नागरिकांनी आरोर्पीना बेदम मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे आधारवाडी कारागृहातून सुटका झाल्यावर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले.
तिथे ज्या मुलींचा त्याने विनयभंग केला होता, तिच्या घरासमोरच ढोलताशा वाजवत धिंगाणा घातला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून उल्हासनगर पोलीसांनी या गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत होती.
यावेळी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशाचा भंग करून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मोटार सायकल रॅली व मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर सार्वजनीक रस्ते बंद करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ढोल ताशे वाजवून, फटाके फोडून मिरवणूक काढली व मिरवणुकीत सहभागी असलेले रोहित बिपीन झा, आशिष उर्फ सोनामणी बिपीन झा व इतरांनी मिळून बेकायदेशिर कृत्य केले.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या आदेशाने उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी विविध कलमांन्वये संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.