

उल्हासनगर: शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनिल शामलाल तलरेजा यांना विविध साहित्य देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 कोटीला गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिल्लीला राहणाऱ्या तिघा जैन बंधूवर गुन्हा दाखल झाला आहेत.
उल्हासनगर कॅम्प 3 येथील व्यापारी हिराघाट येथील केस्ट्रल प्राईड इमारती मध्ये सुनील तलरेजा यांच्या इंदरदिप कन्स्ट्रक्शन कंपनी, इंदरदिप इन्फा इंडीया कंपनीचे कार्यालय आहे. दिल्ली येथे राहणारे व एच.सी. पाईप्स प्रा.लि., एच. सी. पाईप्प व वॉल्स ट्रेडींग कंपनीचे मालक विकास प्रविणकमार जैन, अंकुर प्रविणकुमार जैन, आस्था जैन यांनी तलरेजा यांच्या कार्यालयात येऊन त्यांना व्यवसायामध्ये लागणारे डीआय, एमएस पाईप व इतर सामान वेळेवर देण्याचे आमिष दाखवले.
त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीला ऑर्डर त्यांच्याकडुन घेवुन तो माल वेळेवर पाठवुन व्यवहार पूर्ण केला. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्कम आगाऊ घेवुन तलरेजा यांना ऑर्डर प्रमाणे साहित्य पाठविले नाही.
दिल्लीतील या जैन बंधूनी स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी सुनील तलरेजा यांच्या इंटरदिप कन्स्ट्रक्शन कंपनी, इंदरदिप इन्फा इंडीया कंपनीची दिशाभुल करण्यासाठी गुगल ड्राईव वर बनावट डिस्पॅच डिटेल पाठविले. तसेच व्हॉटस अँपवर बनावट ई-बीले पाठवून 25 कोटी 3 लाख 57 हजार 356 रुपयाची जुन 2023 ते 29 नोव्हेंबर 25 दरम्यान फसवणुक केली.
आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर सुनील तलरेजा यांच्या तक्रारी वरून जैन बंधू विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. मध्यवर्ती पोलिसांनी एच.सी. पाईप्स प्रा.लि., एच. सी. पाईप्प व वॉल्स ट्रेडींग कंपनी दिल्लीचे मालक विकास प्रविणकमार जैन, अंकुर प्रविणकुमार जैन, आस्था जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.