

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत उद्धव सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी 4 नगरसेवक हे बेपत्ता आहे. त्यांना पक्षाने पक्षादेश बजावून सुद्धा त्याला त्यांनी काडीमात्र प्रतिसाद दिलेला नाही. 3 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणूकीच्या वेळेस ते 4 ही नगरसेवक हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्यांच्या विरोधात महापौर पदाच्या निवडणूकी पश्चात त्यांंचे नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे.
उद्धव सेनेचे नगरसेवक मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. पक्षाने या दोन्ही नगरसेवकांना गट स्थापनेच्या आणि गटनेता निवडीच्या बैठकीला बोलाविले होते. तसेच 30 जानेवारीच्या बैठकीलाही बोलाविले होते. या दोन्ही बैठकीला ते हजर राहिलेले नाहीत. त्याचबरोबर उद्धव सेनेचे नगरसेवक राहूल कोट आणि स्वप्नाली केणे हे दोन जणही बेपत्ता आहेत.
त्यापैकी केणे यांच्या घरावर गटनेते उमेश बोरगांवकर यांनी काल रात्री नोटिस बजावली आहे. बैठकीस हजर न राहिल्यास पक्ष विरोधी कारवाई केल्याप्रकरणी पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्फत केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. आज महापौर पद आणि उपहापौर पदासाठी शिंदे सेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिंदे सेनेच्या नेत्यांनी बेपत्ता नगरसेवकांविषयी कोणती भाष्य करणे जाणीवपूर्व टाळले.
या सगळ्या घडामोडीनंतरही ते चार नगरसेवक अद्याप संपर्क क्षेत्राच्या बाहेरच आहे. ते जेव्हा 3 फेब्रुवारी महापौर पदाच्या निवडणूकीस प्रत्यक्षात हजर होती. तेव्हाच त्यांचा नक्की पाठींबा कोणाला आहे ? तसेच या दरम्यानच्या काळात नक्की ते कुठे होते? हे उघड होणार आहे.
आरोप-प्रत्यारोप तक्रारींमधून राजकारण धगधगलेलेच
उद्धव सेनेकडून नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली गेली. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर शहरात चिटकवले. त्याला नगरसेवक मधूर म्हात्रे यांचे वडिल उमेश म्हात्रे यांनी जोरदार हरकत घेत. त्यांच्या मुलांची बदनामी केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पोलिस ठाण्यात दिली. म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केली. या तपासासाठी फोन आल्याने धास्तावलेले उद्धव सेनेचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा ह्रदविकाराच्या झटक्याने रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याचा आरोप उद्धव सेनेकडून केला गेला. हा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला.