

डोंबिवली : बनावट सीम कार्डचा वापर करता...त्याद्वारे कोट्यवधींचे गैरव्यवहार केले आहेत...महिलांना मेसेज पाठवले...तुमच्या विरोधात गुन्हे देखिल दाखल आहेत...घरातून अटक करून तुम्हाला नेणार...अशा धाक/धमक्यांनी घाबरवून सोडून वेगवेगळ्या ठिकाणांच्या भामट्यांनी डोंबिवलीतील दोघा सेवानिवृत्त वृद्धांना तब्बल ३५ लाख २२ हजार रूपयांचा गंडा घातला आहे.
नोकरी करून जमा केलेली आयुष्यभराची पुंजी गमावलेल्या भयभीत वयोवृद्ध डोंबिवलीकरांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी या वृद्धांना धीर दिला आणि दोन्ही प्रकरणांची माहिती घेऊन तपास चक्रांना वेग दिला आहे.
मोहन अण्णा चव्हाण (वय ७४) असे फसवणूक झालेल्या पहिल्या वृद्धाचे नाव असून ते पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रोडला असलेल्या भोईर जिमखाना परिसरात कुटुंबीयांसह राहतात. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर संजय काशिनाथ पंडित (वय ७०) असे फसगत झालेल्या दुसऱ्या वृद्धाचे नाव आहे. लॉईड स्टील कंपनीतून सेवानिवृत्त झालेले संजय पंडित हे पश्चिमेतील देवी चौक पात परिसरात असलेल्या शास्त्रीनगर येथे कुटुंबीयांसह राहतात.
यातील मोहन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यांपूर्वी अभिजीत साहू नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. दूरसंचार निगमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने सीम कार्ड घेतले आहे. त्या सीम कार्डचा वापर करून एका महिलेला मेसेज पाठवून तिची छेड काढण्यात आली आहे.
त्यानंतर साहू याने चव्हाण यांना इतर लोकांशी बोलायला लावले. त्यांनी सांगितले की त्या महिलेने तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. तुमच्या बँक व्यवहारांची चौकशी करायची आहे. नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने २५० कोटी रूपयांचा व्यवहार केला आहे. त्यातील २० लाख रूपये तुमच्या खात्यात आले आहेत. तुमच्या सर्व संपत्तीची चौकशी करावी लागेल. सर्व माहिती आम्हाला पाठवा. आम्ही ती न्यायालयात जमा करू आणि नंतर तुम्ही सोडवून घ्या, असे सांगून भामट्यांनी मोहन चव्हाण यांचा विश्वास संपादन केला.
या साऱ्यातून स्वतःला वाचविण्यासाठी मोहन चव्हाण यांनी बदमाशांनी दिलेल्या आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील इंडस्ट्रियल बँकेच्या खात्यावर १७ लाख रूपये पाठवले. कालांतराने फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
तर दुसरीकडे संजय पंडित यांच्या तक्रारीनुसार, मार्च ते जून या कालावधीत तेजस नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. तो स्वतःला सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याचे सांगून बंगळुरू येथून बोलत असल्याचे म्हणाला. एक महिला आणि तिच्या पतीने तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यासाठी तुम्हाला बंगळुरू येथे यावे लागेल. नाहीतर आम्ही घरी येऊन अटक करू अशी धमकी दिली. हे प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून भामट्यांनी पंडित यांच्याकडून १८ लाख २२ हजार रूपये ऑनलाईनद्वारे उकळले.
दोन्ही तक्रारींच्या आधारे विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः वृद्ध मंडळींना आवाहन केले आहे. दूरसंचार विभाग, पोलिस किंवा न्यायालयाच्या नावाने आलेल्या संशयास्पद फोनला घाबरू नये. बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा पैसे कोणालाही पाठवू नयेत. अशा प्रकारचा फोन आल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.