ठाणे : ठाण्यातील शीळ धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या झाली. मुंडकं धडा वेगळं केलं, दोन्ही हात तोडून त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. इतकेच नाही तर हत्या करताना व्हिडिओ देखील बनवला. याप्रकरणी दोन भावाना अटक करण्यात आली आहे. फैज सुलतान मालीम, अल्बान सुलतान मालीम अशी आरोपींची नावे आहेत.
मित्रांमध्ये झालेल्या जुन्या वादाचा राग मनात ठेवून दोघांनी मिळून तिसऱ्या मित्राची निर्घृण हत्या करून मयताची ओळख पटू नये म्हणून त्याचे मुंडके व हात छाटून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा उल्हासनगर युनिटच्या पथकाने अटक केली आहे.
दिनांक 13 मार्च 2026 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खर्डी गाव परिसरात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची तर मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास मुंब्रा पोलीस व ठाणे गुन्हे शाखेचे पथक करीत होते.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना या गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर उल्हासनगर युनिटच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना मुंब्रातून अटक केली. दोघा आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता अमन शेखला श्रीलंका एरिया, मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये बसवलं. नंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन त्याचा धारधार चाकूने गळा चिरला. त्यानंतर मयताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे केले. खर्डीगांव येथे मृतदेह टाकून दिला. मृतदेहाचे दोन्ही हात कापले. तसेच अमनची हत्या करताना आरोपींनी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट सुद्धा केला होता. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
जुन्या वादातून हत्या
तीन महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाच्या झालेल्या हत्याच्या घटनेतील आरोपींची माहिती गुन्हे शाखा उल्हासनगर युनिटच्या पथकास मिळाल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली असता आरोपींनी आपलाच मित्र अमन मुस्तकीन शेख (23, रशीद कंपाउंड, मुंब्रा) याची धारदार हत्याराने गळा चिरून 13 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दोघांनी मृतदेहाचे मुंडके व हात छाटून मृतदेह खर्डी गाव परिसरात निर्जन स्थळी टाकून दिला होता.
विशेष म्हणजे ही हत्या करताना व मृतदेहाचे तुकडे करतांना दोघा आरोपींनी साऱ्या घटनेचे व्हिडीओ शूट केले होते. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील व्हिडीओ व मोबाईल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फैज सुलतान मालिम हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील मुंब्रा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.