

भिवंडी : तिहेरी तलाक पद्धतीला केंद्र सरकारकडून 2019 साली कायद्याने बंदी घातली असताना हुंड्यात बुलेट दिली नसल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
विशेष म्हणजे तिहेरी तलाकची ही घटना पिडीत पत्नीचे सासर असलेल्या उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. पती राशीद, शबनम अहमद (सासू ) मो अहमद, सासरे, नणंद अर्फा अहमद आणि पलावया अशी तिहेरी तलाक तसेच मुस्लीम विवाह कायदा आणि हुंडाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय पीडित महिला ही भिवंडी शहरातील बुबेरे कंपाऊंड, रोशन बाग परिसरात राहते. पिडीतेचा निकाह उत्तरप्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील नन्हाई गवात राहणारे राशीद यांच्या सोबत काही महिन्यांपूर्वीच झाला होता.
पीडिता निकाहनंतर सासरी म्हणजे नन्हाई गावात पतीच्या घरी नांदायला गेली. त्यानंतर मात्र, पीडित महिलेच्या माहेरच्यांनी हुंड्यात बुलेट दिली नव्हती यावरून सासरच्या मंडळीशी खटके उडाल्याने पीडित महिला त्रस्त झाली होती. त्यातच 19 ऑक्टोबर ते 11 नोव्हेबरदरम्यान सासरच्या मंडळींनी मारहाण केली. तसेच पतीने तलाक देऊन या पीडित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.
भिवंडीत आतापर्यंत तिहेरी तलाकच्या 35 हून अधिक घटना
व्हाट्सअपवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याची घटना भिवंडीत यापूर्वीही घडली होती. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे पतीने ट्रिपल तलाक देताना उर्दू, अरेबिक आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हाट्सअपवर लिहून तलाक दिला होता. केंद्र सरकाराने मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी तिहेरी तलाक कायदा लागू केला आहे. तरीही तेव्हापासून भिवंडीत 35 हून अधिक ट्रिपल तलाकच्या घटना घडल्या आहेत.