

ठाणे : लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये वाढत्या चोऱ्यांमुंळे प्रवासी हैराण झाले आहेत. गेल्या महिन्याभरात ठाणे परिसरात मोबाईल व सोनसाखळी चोरी, तसेच कोल्हापूर एक्स्प्रेसमधून रोख रक्कम पळवली. तर ठाणे कळवा मुंब्रा येथे मोबाईल चोरीच्याही घटना घडल्या आहेत.
ठाण्यात गर्दीची ठिकाणे परिवहन बस आणि गर्दीच्या लोकल गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. रेल्वे पोलिसांच्या डोक्याला हे भुरटे चोरटे ताप ठरत आहेत. मोबाईल चोरीच्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. ठाणे लोहमार्ग पोलीस भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दिवाळीच्या सणात प्रवाशांना आर्थिक फटका बसलेला असतानाच चोरट्यांना मात्र सुवर्णसंधी आणि यंदाची सुगीची दिवाळी ठरलेली आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू मात्र असुरक्षित झाल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांवरून दिसत आहे.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या व सोनसाखळी चोरीच्या रोज घटना घडत आहेत. चोरट्यांनी लोकलच्या गर्दीच्या डब्ब्यात शिरकाव करत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर हातसफाई करून धक्का दिला आहे. गर्दीमुळे चोरटे हे ठाणे लोहमार्ग पोलिसांना गुंगारा देत आहेत. दिवाळीच्या सणात चोरट्यांनी चोऱ्या करून प्रवाशांना धक्काच दिला आहे. भाऊबीजेच्या दिवशी अनेक घटनांची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
दिवाळीच्या सुट्टीसाठी आपल्या आजीसह कोल्हापूर येथून दिव्यात आलेल्या आजी-नातीचा मोबाईल चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत आजी आणि नातीचे 74 हजाराचे दोन मोबाईल चोरीस गेल्याचा गुन्हा गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील तक्रारदार तरुणी 23 ऑक्टोबर रोजी त्यांच्या आजी आणि आईसोबत कोल्हापूर येथून ठाण्यातील दिवा येथे दिवाळी सुट्टीनिमित्त आजीकडे राहण्यासाठी येत होत्या. नातीचा 64 हजारांचा तर आजीचा 10 हजारांचा असे 74 हजारांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.
त्याच दिवशी 61 वर्षीय लाडक्या भावाची 30 ग्रॅमची सोनसाखळी रेल्वे लोकलमधून उतरताना अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार दाखल झाली. 23 ऑक्टोबर रोजी ते सकाळी डोंबिवलीत बहिणीकडे गेले होते. तेथून दुसरी बहीण ठाण्यात राहत असल्याने तिच्या जाण्यासाठी डोंबिवली फलाट क्रमांक 4 वर दुपारी तीन वाजून 8 मिनिटांनी आलेल्या सीएसएमटी लोकलमध्ये चढले. ठाणे रेल्वे स्थानकात आल्यावर गर्दीत उतरताना, गळ्यातील सोनसाखळी खेचल्याचे जाणवले. फलाटावर उतरल्यावर सोनसाखळी सापडली नाही. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
कुर्ला येथे भाऊबीजेसाठी निघालेल्या ठाणे, विटावा सुर्यानगर येथील काका-पुतण्यांना लोकल प्रवास महागात पडला. त्या दोघांचे महागडे मोबाईल फोन चोरीला गेले असून विटावा येथील 28 वर्षीय तक्रारदार हे वडील व त्यांचे 70 वर्षीय काकांसोबत कुर्ला येथे आत्याकडे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी भाऊबीजेला निघाले होते. ठाणे रेल्वे फलाट क्रमांक 4 वरून ते तिघे 1:20 वाजेदरम्यान सीएसएमटी धीमी लोकलमध्ये चढले होते.
यावेळी तक्रारदारांनी दोन्ही मोबाईल खिश्यात ठेवले होते. ते मोबाईल चढताना कोणीतरी गर्दीचा फायदा उचलून लांबवले. याप्रकरणी त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली. त्यामध्ये तक्रारदारांचा 80 हजारांचा आणि त्यांच्या काकांचा 15 हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.