

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
खाडीपट्टयामध्ये परतीच्या पावसाने शुक्रवारी धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भात कापणीचा हंगाम लांबणीवर पडला असल्याचे खाडीपट्टयातील शेतकऱ्यांनी सांगितले. अधून-मधून येणाऱ्या वादळी वारा, विजांच्या कडकडासह परतीच्या मुसळधार पावसाने खाडीपट्टयातील शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले असल्याचे प्रत्यक्ष खाडीपट्टयाच्या शिवारामध्ये फेरफटका मारल्याने पाहायला मिळाले.
गेली कित्येक दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याबरोबर मुसळधार पावसाने खाडीपट्टयातील भातशेतीचे नुकसान केले आहे. खाडीपट्ट्यातील शिवार भात पिकाने चांगले पिवळ्या सोन्यासारखे चकाकत असताना गेली सात-आठ दिवसांमध्ये अधून-मधून सायंकाळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळते. गुरुवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस पूर्ण रात्रभर कोसळला, तर शुक्रवारी देखील दुपारनंतर विजांच्या कडकडाटसह वादळी पावसाने खाडीपट्टयातील भात शेतीचे नुकसान केले आहे.
खाडीपट्टयाच्या कित्येक भागामध्ये नवरात्रौत्सवापश्चात भात कापणीचा हंगाम सुरू होईल असे वातावरण तयार झाले होते, मात्र दुर्दैवाने वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटसह वादळी पावसाने धुमाकूळ घालून भात शेतीचे भरमसाठ नुकसान केले आहे. टवटवीत फुललेल्या भात पिकाने मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मान टाकली असून हे पीक चिखलामध्ये रुतले गेले आहे. ते वाचण्याची शक्यता धुसर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी भात पिकाच्या पेरणी पासून निसर्गाने दिलेली चांगली साथ यामुळे यंदा भात शेतीसाठी चांगले वातावरण तयार झाले होते, मात्र अखेर दुर्दैवाने परतीच्या पावसाने खाडीपाट्टयातील सर्व शेतीला धोका पोहोचला असून ऑक्टोबरची हिट आणि सायंकाळी पडणारे वादळी वाऱ्यासह पाऊस यामुळे भात शेती नुकसानीच्या खाईत कोसळली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता कोलमडताना पाहायला मिळत आहे.
ओला दुष्काळ उद्भवण्याची भीती
परतीच्या पावसामुळे भात शेतीचे पीक वाया जाण्याची शक्यता असून ओला दुष्काळ उद्भवण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसाचा धुमाकूळ होत असल्याने थोडीशी तरी उघडी पावसाने घेतली, तर शेतकऱ्यांना भात कापणी करता आली असती, मात्र पाऊस जाण्याचे चिन्हच नाही. दुसरीकडे रान डुकरांकडून देखील भात पिकाचे नुकसान पोहचत आहे.
परतीच्या पावसामुळे पडलेल्या लोंबीना जाग्यावर कोंब येण्याची भीती असून हातातोंडाशी आलेले पीक घरी कसे येणार याची चिंता आम्हाला सतावत आहे.
तुकाराम आंबेकर, नुकसानग्रस्त शेतकरी, चिंभावे