

मुरबाड शहर ः किशोर गायकवाड
एका बाजूला प्लास्टिक, फायबर आणि कृत्रिम वस्तूंनी बाजारपेठ व्यापलेली असताना, सरळगावच्या आठवडी बाजारात मात्र अजूनही काही हात परंपरेचा वारसा जपताना दिसतात. बांबूपासून तयार केलेल्या गृहउपयोगी वस्तू विक्रीसाठी घेऊन उभे असलेले शहापूर तालुक्यातील नडगाव (सो.) येथील कष्टकरी शेतकरी नारायण घायवट हे त्यापैकीच एक म्हणावे लागतील. ग्रामीण संस्कृतीची ओळख मानल्या जाणाऱ्या पूर्णपणे हस्तनिर्मित बांबूच्या कुक्कुटपालनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चाफ’, तसेच कांदा-लसूण साठवणीचे पारंपरिक ‘करंडे’ आजही ते बाजारात विक्रीसाठी आणतात.
एकेकाळी प्रत्येक ग्रामीण घरात सहज दिसणाऱ्या या वस्तू आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यामुळे या वस्तू पाहताना अनेकांना जुने दिवस आठवतात, तर नव्या पिढीला त्या केवळ शोभेच्या वस्तू वाटू लागल्या आहेत.
घायवट हे चाफ सुमारे 200 रुपयांपासून, तर करंडे 100 ते 120 रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवतात. मात्र या वस्तू तयार करण्यामागील मेहनत आणि कलेचे मोल आजच्या बाजारात फारसे उरलेले दिसत नाही. या वस्तू तयार करण्यासाठी ‘मेस’ नावाचा विशेष प्रकारचा बांबू वापरला जातो.
हा बांबू लवचिक, मजबूत आणि टिकाऊ असल्याने त्यापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. एक चाफ तयार करण्यासाठी किमान पाच ते सहा बांबू लागतात, अशी माहिती घायवट यांनी दिली. तर करंड्यांचे झाकण, कडी आणि त्यावरील सुबक गोफण हे अत्यंत कौशल्याचे काम असल्याने त्यालाही बराच वेळ लागतो.
‘जसा माल तयार होतो, तसा विक्रीसाठी मुरबाड, शहापूर परिसरात घेऊन फिरतो. पण आता पूर्वीसारखी मागणी राहिलेली नाही. प्लास्टिकच्या वस्तूंनी बाजार व्यापला आहे. लोक भाव करून घेतात. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी,’ अशी खंत घायवट यांनी व्यक्त केली. या वस्तू तयार करण्यासाठी केवळ कारागिरी नव्हे, तर संयम आणि निसर्गाशी नाळ जोडलेली असावी लागते.
बांबूची रोपे वर्षानुवर्षे जपावी लागतात. त्यानंतर तयार माल बाजारात आणल्यावरही रस्त्याच्या कडेला उभे राहून ग्राहकांची वाट पाहावी लागते. त्यात वाहतूक खर्च, उन्हाचा त्रास आणि ‘इथे उभे राहू नका, तिथे नका थांबू’ अशा हुसकावण्यांचाही सामना करावा लागतो. पूर्वी ग्रामीण घरांमध्ये कांदा-लसूण साठवण्यासाठी बांबूची करंडे वापरली जात. ही करंडे छताला टांगल्यामुळे त्यातील वस्तू नैसर्गिक वातावरणात टिकून राहत आणि उंदीर, मांजर, कुत्रा यांसारख्या प्राण्यांपासून संरक्षणही मिळत असे. आज मात्र त्यांची जागा प्लास्टिकच्या डब्यांनी घेतली आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली कृत्रिम वस्तूंना अधिक महत्त्व मिळत असताना, पर्यावरणपूरक आणि आरोग्यास हितकारक अशा नैसर्गिक वस्तूंची उपेक्षा होताना दिसते. प्लास्टिकच्या वस्तू सहज उपलब्ध असल्या, तरी त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके आता सर्वांसमोर येत आहेत. अशा परिस्थितीत बांबूच्या वस्तू केवळ परंपरा नसून निसर्गाशी जोडणारी जीवनशैली आहेत. आज काही शहरी हौशी लोक या वस्तू केवळ सजावटीसाठी खरेदी करतात, तर काही ग्रामीण व स्थलांतरित कुटुंबांमुळेच या कारागिरांचे अस्तित्व टिकून आहे.
कांदा-लसूण साठवणीचे करंडे यामध्ये कडी आणि झाकण अतिशय सुबक पद्धतीने गोफलेले असते. ते घराच्या छताला टांगले जात असल्याने सामान नैसर्गिक वातावरणात सुरक्षित राहत असे. शिवाय पूर्वी घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी असल्याने त्यांच्यापासूनही संरक्षण मिळत असे. हा त्याचा दुहेरी फायदा होता.
धनाजी टिळे, जुन्या पारंपरिक वस्तूंचे जाणकार