Bedse Caves | बेडसे पर्वतीय लेणी

Bedse Caves |
Bedse Caves | बेडसे पर्वतीय लेणी
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

बेडसे बौद्ध लेणी हे एक लहान बौद्ध भिक्षू निवासस्थान असून लेणी संकुल आहे. येथे एकूण केवळ 15 लेणी कोरण्यात आली आहेत. ही लेणी सपाटीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर आणि समुद्रसपाटीपासून 661 मीटर उंचीवर स्थित आहेत. लेणी पूर्वाभिमुख असून येथे त्यांना दक्षिणेकडून उत्तरेकडे असे क्रमांक देण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात मळवली गावाच्या मागच्या बाजूस बेडसे नावाचं लहानसं गाव आहे. गावाच्या बाजूलाच महाकाय डोंगर दिसतो आणि त्या डोंगरात बेडसे लेणी स्थित आहेत. लेण्यांना जाणार्‍या पायर्‍या आपल्याला खालूनही स्पष्ट दिसतात. भाजे लेण्यांची ही मागची बाजू. त्याच डोंगरात भाजे, बेडसे लेणी आणि लोहगड किल्ला वसलेला आहे. बेडसे बौद्ध लेणी हे एक लहान बौद्ध भिक्षू निवासस्थान असून लेणी संकुल आहे. येथे एकूण केवळ 15 लेणी कोरण्यात आली आहेत. ही लेणी सपाटीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर आणि समुद्रसपाटीपासून 661 मीटर उंचीवर स्थित आहेत. लेणी पूर्वाभिमुख असून येथे त्यांना दक्षिणेकडून उत्तरेकडे असे क्रमांक देण्यात आले आहेत. या लेण्यांचा काळ इ.स.पू. 1 ते दुसर्‍या शतकातील मानला जातो.

लेणी क्रमांक 1 हे दक्षिण दिशेला एक अपूर्ण वर्तुळाकार चैत्यगृह आहे. लेणी क्रमांक 3 हे एक ‘चैत्य’ किंवा ‘दागोबा’ (स्तूप) आहे. लेण्याचा पुढचा आणि वरचा भाग पडला आहे. याच्या गोलाकार गाभार्‍याच्या मध्यभागी एक स्तूप उभारलेला आहे आणि मध्यभागी स्तुपावर छिद्रे आहेत. ही छिद्रे कदाचित ‘हर्मिका’ (स्तुपाच्या माथ्यावरील चौकोनी रचना) बसवण्यासाठी असावीत, जी बहुधा लाकडाची बनलेली असावी. या गोलाकार स्तुपाच्या मागील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. तो ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत असून त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे. या ‘गोभूतिनां आरणकान पेंडपातिकानं मारकूडवासिना थुपो... आंतेवासिना भतासालमितेन कारित।’ एका ‘स्थविरा’च्या (थोर भिक्षूच्या) शिष्याने आपल्या गुरूच्या सन्मानार्थ येथे हे चैत्य मंदिर (स्तूप) उभारले. हे गुरू स्वतःच एकांतवासी (अरण्यवासी) राहणे पसंत करत असत. अशा आशयाचा हा शिलालेख आहे. ‘मारकुडावर राहणार्‍या भिक्षेवर उदरनिर्वाह करणार्‍या आरण्यक गोभूतीचा शिष्य असालमित (आषाढमित्र) याने केलेला स्तूप’ अशा अर्थाचा हा शिलालेख आपल्याला या पर्वताचे नाव मारकूड असावे असा स्थलनिर्देश करतो.

चैत्यगृहाच्या बाहेर पाण्याच्या खोदीव टाकीवर अजून एक महत्त्वाचा लेख आहे. त्याचा अर्थ असा आहे, महाभोज यांची कन्या, ‘महादेवी महारठिनी’ आणि आपदेवनाक यांची दुसरी पत्नी असलेल्या समदिनिका हिने दिलेली ही धार्मिक देणगी आहे. हा शिलालेख अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. महारठींचा काळ समजल्याने त्यावरून आपल्याला लेण्यांचा काळ समजून घ्यायला मदत होते. दुसरं म्हणजे, स्त्रिया दान देत आहेत, म्हणजे स्त्रियांना त्या काळात आर्थिक स्वातंत्र्य असावे, हे निश्चित!

लेणी क्रमांक 7 हे एक भव्य ‘चैत्यगृह’ असून, बेडसे येथील शैलगृहांमध्ये (दगडात कोरलेल्या लेण्यांमध्ये) हे सर्वात उत्कृष्ट आणि आकाराने सर्वात मोठे आहे. या लेण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की, संपूर्ण लेण्याच्या भागांचं प्रमाण गणितीय पद्धतीने बांधलं गेलं आहे. यातील विविध भागांचे प्रमाण इतक्या गणितीय पद्धतीने निश्चित करून इतक्या सूक्ष्मतेने अंमलात आणले आहे की, शैलगृह-वास्तुकलेच्या इतिहासात ही एक अत्यंत वाखाणण्याजोगी कामगिरी ठरली आहे. मोजमापांवरून असे लक्षात येते की, या चैत्यगृहाच्या अंतर्भागाची रुंदी 6.25 मीटर आहे आणि जमिनीपासून ते छताच्या कमानीच्या सर्वोच्च बिंदूपर्यंतची उंचीही नेमकी तितकीच आहे. स्तंभांच्या मधोमध असलेल्या मुख्य दालनाची रुंदी 3.12 मीटर ही वरील मापाच्या नेमकी निम्मी आहे. मुख्य दालनाच्या दोन्ही बाजूंकडील उपदालनांची रुंदी ही एकूण रुंदीच्या पावपट आहे. स्तंभांची उंचीही चैत्यगृहाच्या एकूण उंचीच्या निम्मी आहे. उर्वरित निम्मी उंची ही ‘ट्रायफोरियम’ (स्तंभांवरील भिंतीचा भाग) आणि छताच्या कमानीची मिळून बनलेली आहे. या चैत्यगृहाची लांबी अशाप्रकारे निश्चित करण्यात आली आहे की, ज्यामुळे स्तुपाला आतमध्ये अत्यंत सुव्यवस्थित आणि योग्य स्थानी सामावून घेता येईल. स्तूप हा सभागृहाच्या एकूण रुंदीच्या नेमका एक तृतीयांश इतका आहे आणि तो मध्यभागी, बाजूंच्या व मागील भिंतींपासून समान अंतरावर स्थित आहे. समोरील व्हरांड्याची मापेदेखील नियमित गणितीय प्रमाण दर्शवतात. व्हरांड्याची एकूण रुंदी ही आतील सभागृहाच्या रुंदीच्या नेमकी दीडपट आहे. (अशी आणखीही अनेक प्रमाणे येथे आढळतात). ही सर्व मापे हेच सिद्ध करतात की, येथील वास्तू नियोजन अत्यंत परिपूर्ण असून ते सखोल विचार आणि कदाचित दीर्घकालीन परंपरेवर आधारित आहे. ही संपूर्ण वास्तू एकाच टप्प्यातील नियोजनाचा परिणाम आहे. या चैत्यगृहात सभागृहाच्या समोर असलेली दगडी भिंत, व्हरांडा, अर्धकुंभ व स्तंभशीर्षावरील प्राणी तसेच त्यांच्यावर स्वार दंपती यासारखे महत्त्वाचे वास्तुशास्त्रीय घटक समाविष्ट आहेत. या वैशिष्ट्यांच्या बाबतीत हे चैत्यगृह कार्ले आणि कान्हेरी येथील चैत्यगृहांच्याच श्रेणीत मोडते, शिवाय भाजे, कोडाणे, पितळखोरा इत्यादींसारख्या प्राचीन चैत्यगृहांच्या तुलनेत येथील वैशिष्ट्ये निश्चितच अधिक प्रगत स्वरूपाची आहेत.

व्हरांड्याच्या भिंतींवरील सजावट उत्कृष्ट अशा कोरीवकाम शिल्पकलेने केली आहे. या काळातील इतर कोणत्याही चैत्यगृहात येथील व्हरांड्याच्या मागील कोपर्‍यांमध्ये दिसणार्‍या आणि दोन बाकड्यांनी युक्त असलेल्या ‘निवास खोल्यां’सारख्या खोल्या आढळत नाहीत. या खोल्यांच्या दरवाजावर एका ओळीतील ‘नासिकचा रहिवासी, आनंद सेठीचा पुत्र पुसनक याचे हे दान’ अशा अर्थाचा शिलालेख कोरलेला आहे. ही बाब, तसेच येथे बुद्धाची कोणतीही मूर्ती किंवा आकृती पूर्णपणे अनुपस्थित असणे, हे या लयनस्थापत्याचा ‘प्रारंभिक काळ’ आणि ‘हीनयान पंथाशी संबंधित’ असण्याचे सर्वात निर्णायक पुरावे मानले जातात. येथील लाकडी कामाचा (काष्ठशिल्पांचा) सर्व भाग इ.स. 1860 च्या सुमारास पूर्णपणे नष्ट झाला. इ.स. 1871 पर्यंत तरी येथील स्तंभांवर प्राचीन चित्रांचे काही भाग स्पष्टपणे ओळखता येत होते. यात प्रामुख्याने बुद्धाची आणि त्याच्या अनुयायांची चित्रे होती; परंतु एका स्थानिक अधिकार्‍याने या सुंदर लेण्यांची स्वच्छता करण्याच्या कल्पनेतून संपूर्ण वास्तूवर चुन्याचा गिलावा फासला आणि ती सर्व चित्रे कायमची नष्ट करून टाकली. स्तंभाचे ‘शीर्ष’ ज्या पेटीसारख्या आधारावर टेकलेले असते, ती पेटी आकाराने लहान आहे आणि तिच्यावर एक अत्यंत जड व भव्य स्तंभ शीर्ष विराजमान आहे. चैत्यातले व्हरांड्यातले खांब आतील बाजूस काहीसे तिरपे आहेत, हे भाजे या प्राचीनतम लेण्यांशी मिळतेजुळते अजून एक लक्षण आहे. तसेच आतील बाजूस असलेले खांबदेखील लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली असल्याची ग्वाही देतात. समोरील दोन अनियमित खांबांच्या बाजूला 10 फूट उंच 24 अष्टकोनी खांब आहेत. या खांबांच्या वर लाकडी कमानी बसवल्या जात असत. आतल्या खांबांवर अनेक चक्र, कमळ इत्यादी बौद्ध शुभचिन्हे कोरली आहेत.

लेणी क्रमांक 11 हे असामान्य स्वरूपाचे विहार आहे. मुख्य विहार चैत्यासारखा असून, त्याचा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतल्या बाजूचा भाग अर्धवर्तुळाकार, दरवाजापर्यंतचा भाग आयताकृती व छत गजपृष्ठाकृती असे हे एकमेव अद्वितीय विहार आहे आणि त्याला घुमटाकार छत आहे. अशी रचना फक्त चैत्यात असते. तो कसा बंद केला जात होता, हे सांगणे कठीण आहे; मात्र लेण्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन खड्डे आहेत आणि त्याचप्रकारे सारख्याच मापाचे खांब असावेत. असे वाटते की, कधीकाळी इथे लाकडाच्या साहाय्याने चैत्यगृहासारखाच व्हरांडा तयार केलेला असावा. दोन्ही भिंतींवर आणि छतावर एकाच रेषेत असलेल्या दोन उभ्या खांबांवरून असे सूचित होते की, एकेकाळी येथे एक लाकडी पडदा उभा असावा. बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक, अशा दोन बाक असलेल्या खोल्या आहेत. हा विहार 18 फूट रुंद आणि 32 फूट खोल असून त्यात एकूण 11 खोल्या आहेत, ज्या सर्वांमध्ये बाक किंवा पलंग आहेत. त्यांच्या दारांवर चैत्याच्या कमानी आहेत. त्या बाकांच्या खालच्या बाजूस काही गुप्त धन इत्यादी ठेवण्यासाठी खड्डा केलेला दिसतो. कदाचित तत्कालीन व्यापारी तिथे निवास करताना धन सुरक्षित म्हणून ठेवत असावेत.

विहाराच्या पलीकडे असलेल्या इतर लेण्यांमध्ये आणखी एक लेणे आहे आणि पायर्‍यांवरून पलीकडे गेल्यास धबधब्यात एक लहान उघडे पाण्याचे टाके आहे. हे स्नानाचे टाके असावे. थोडं वरच्या बाजूस 14 फूट 8 इंच चौरस आकाराची, 7 फूट रुंदीचा दरवाजा असलेली दुसरी एक साधी खोली आहे. हे सामान्य यात्रेकरूंसाठी खुले विश्रामगृह असू शकते. बेडसे लेण्यांची संख्या कमी आहे; पण जी आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news