ठाणे : मिरा-भाईंदरमध्ये 53 हजार मतदार वाढले

Vidhansabha Election 2024 | वाढीव मतदारांची मते निर्णायक ठरणार!
Maharashtra Election
मतदार Pudhari
Published on
Updated on
भाईंदर : राजू काळे

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते सध्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राबविण्यात आलेल्या नवीन मतदार नोंदणी अभियानात मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघात एकूण 53 हजार 490 नवीन मतदारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. या वाढीव नवीन मतदारांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश असून या नवीन मतदारांची मते यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या नवीन मतदारांमध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश असून मतदार संघातील समस्या, त्या मार्गी लावण्यासाठी झालेल्या उपाययोजनांबाबत हे मतदार अधिक सजग असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. यामुळे हे मतदार व्यक्तिगत टिका-टिप्पणीला विशेष महत्व देणार नसल्याचे बोलले जात असून यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबाबत देखील नवीन मतदार जागृत असल्याचा दावा केला जात आहे. सध्या शहराला तसेच शहरातील लोकांना भेडसावणार्‍या समस्याच नवीन मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात असून या समस्या मार्गी लावणारेच शहराचा विकास करू शकतील, असा विचारही वाढीव नवीन मतदारांमधील तरुण वर्ग करीत असल्याचे सांगण्यात येते. मिरा-भाईंदर मतदार संघामध्ये एकूण मतदारांची संख्या 5 लाख 10 हजार 862 इतकी असून त्यात गेल्या लोकसभा ते सध्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राबविण्यात आलेल्या नवीन मतदार नोंदणी अभियानांतर्गत वाढलेल्या 53 हजार 490 मतदारांचा समावेश आहे. या वाढीव नवीन मतदारांमध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 67 हजार 785 इतकी असून महिला मतदारांची संख्या 2 लाख 43 हजार 72 इतकी आहे. याखेरीज तृतीयपंथी मतदारांची संख्या केवळ 5 इतकी दर्शविण्यात आली आहे. गतवेळच्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 4 लाख 57 हजार 367 इतकी होती. त्यापैकी 48.41 टक्के म्हणजेच मतदारांनी मतदान केले होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार गिता जैन यांना एकूण 79 हजार 575 मते मिळून त्या अवघ्या 15 हजार 526 मतांच्या फरकाने विजयी ठरल्या होत्या. त्यांच्या मतांची टक्केवारी 37.60 टक्के इतकी होती.

दुसर्‍या क्रमांकावरील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना एकूण 63 हजार 992 मते मिळून त्यांच्या मतांची टक्केवारी 30.26 टक्के इतकी होती. तसेच तिसर्‍या क्रमांकावरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांना एकूण 55 हजार 899 मते मिळून त्यांच्या मतांची टक्केवारी 26.43 टक्के इतकी होती. यातील विजयी उमेदवार दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवारापेक्षा केवळ 7.34 टक्क्यांच्या फरकानेच विजयी ठरल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणुकीतही हे तिन्ही उमेदवार पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

यंदाच्या वाढीव नवीन मतदारांची मते मात्र त्यात निर्णायक ठरतील, असे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून केले जात आहे. या एकूण वाढीव नवीन मतदारांमध्ये पुरुष मतदारांची संख्या 24 हजर 813 तर महिला मतदारांची संख्या 28 हजार 677 इतकी दर्शविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news