

Thane woman burned alive
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या पिसवली गावात शनिवारी सकाळच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. देवाची पूजा करत असताना देव्हाऱ्यातील दिव्याची पेटती वात अंगावर पडून भाविक महिलेचा होरपळून मृत्यू झाला. या महिलेवर सुरूवातीला जवळच्या आणि त्यानंतर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. परंतु गंभीररित्या होरपळलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोकाकुळ वातावरण पसरले आहे.
अर्चना धर्मेंद्र कुमार (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबीयांसह पिसवलीतील दुर्गामाता मंदिर परिसरात राहत होती. या प्रकरणी महिलेचा पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलिसांना तशी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना ही शनिवारी सकाळी घरात देवपूजा करत होती. पूजा झाल्यानंतर अर्चना ही देव्हाऱ्यातील दिवे पेटवून देवांना ओवाळत होती. इतक्यात दिव्यातील पेटती वात अंगावर पडली आणि अर्चनाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. अर्चनाला स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. अंगावरील कपडे पेटल्याने अर्चना होरपळून गेली. घरच्यांनी तात्काळ कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या काका ढाबा परिसरातील जानकी ग्लोबल नामक खासगी रूग्णालयात दाखल केले.
प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तेथील डॉक्टरांनी तिला डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स रूग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. अर्चनाला तात्काळ एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रूग्णालयात डॉक्टरांनी जबर होरपळलेल्या अर्चनाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. अखेर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश बंडगर अधिक तपास करत आहेत.