टिटवाळा : मुरबाड तालुक्यातील आदिवासी शेतकरी गोविंद तुका खाकर यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. प्रत्यक्ष आणि भावनिकदृष्ट्याही. केळेवाडी गावातून घराकडे परतत असताना विजेच्या तडाख्याने त्यांच्या चारही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतीवरच अवलंबून असलेल्या खाकर यांच्यासाठी हा आघात फारच मोठा होता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या शेतकऱ्याला नव्याने बैलजोडी खरेदी करणे अशक्यप्राय होते. मात्र दानशूर व्यक्तींच्या हातून एकत्रित झालेल्या निधीतून नव्या बैलजोडीची खरेदी करून देण्यात आली.
शासकीय मदतीसाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नसताना, गावातील काही सजग आणि संवेदनशील व्यक्तींनी एक वेगळाच मार्ग निवडला. जि.प. ठाणेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उपक्रम लोकसहभागाच्या रूपाने एक उदाहरण ठरला.
ठाणे-पालघर सहकार बोर्डाचे संचालक प्रकाश पवार, माजी सदस्य संजय पवार, समाजसेवक रघुनाथ खाकर, बंडू पवार, विलास घरत व अन्य कार्यकर्त्यांनी एक व्हॉट्सअॅप संदेश गावकऱ्यांमध्ये पाठवला आणि मदतीचा ओघ सुरू झाला.
योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या हातून एकत्रित झालेल्या निधीतून नव्या बैलजोडीची खरेदी करून ती १४ जून रोजी शेतकऱ्याच्या घरी नेण्यात आली. गावात झालेल्या याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत बैलजोडी सुपूर्द करण्यात आली.
शेतकरी गोविंद खाकर यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. हा प्रसंग केवळ एका बैलजोडीच्या मदतीपुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवी एकतेचा, माणुसकीचा आणि गरजूंशी नातं जपण्याचा प्रेरणादायी अनुभव ठरला.