

ठाणे : आधीच ठाण्यातील काही भागात पाणी टंचाईच्या झळा बसत असून ठाण्यातील अनेक मोठी गृहसंकुलाना टँकरपोटी महिन्याला लाखो रुपये मोजावे लागतात. अशातच महानगर गॅसचे काम करणार्या ठेकेदाराच्या चुकीमुळे ठाणेकरांवर अक्षरशः पाणीबाणीची वेळ आली असून ठाणेकरांवर ही वेळ आणणार्या ठेकेदारावर ठाणे महापालिकेच्या वतीने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने ठाणेकर मात्र संतापले आहेत. तर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मात्र केवळ काम करणे हे आमचे प्राध्यान असल्याचे सांगत अद्याप या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यास धजावत नसल्याचे समोर आले.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामांमध्ये चार ते पाच ठिकाणी नादुरुस्त झाली होती. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणखीन किती दिवस लागणार हे अद्याप निश्चित नाही . यामुळे ठाण्याला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून 19 डिसेंबर पर्यंत शहरात 50 टक्के पाणी कपात सुरूच राहणार असून पाणी जपुन वापरण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने ठाणेकरांना केले आहे.
पिसे बंधार्यातुन ठाणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1 हजार मिलिलिटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामांमध्ये पहिल्यांदा 6 डिसेंबर रोजी फुटली होती. यामुळे 30 टक्के पाणी कपात केली होती. ही दुरुस्ती पुर्ण होत नाही तोच ही जलवाहिनी पुन्हा गुरुवारी दुपारी चार ते पाच ठिकाणी नादुरुस्त झाली.या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गेले 8 ते 10 दिवसांपासून पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहे. जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे सुरुवातीला 15 डिसेंबर पर्यंत 50 टक्के लागु केलेली पाणी कपात 19 डिसेंबरपर्यंत सुरूच असल्याने नागरिकांची भिस्त टँकरवर आहे. मात्र ज्या ठेकेदारामुळे ठाणेकरांना हा सर्व मनःस्ताप सहन करावा लागत आहे, त्या ठेकेदारावर अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेले नाही.
याउलट आधी काम करणे हे प्राधान्य असून त्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात येईल, अशी वेळ मारून नेणारी उत्तरे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांकडून देण्यात येत आहे. ठाणे महापालिकेचे काम सुरु असताना काही नुकसान झाले तर इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र ठाणेकरांना एवढे दिवस पाणीबाणीची परिस्थिती आणणार्या ठेकेदारावर अद्याप का गुन्हा दाखल केला जात नाही, पालिकेचे अधिकारी या ठेकेदारावर एवढे का मेहरबान आहेत याची चर्चा मात्र पालिका वर्तुळात जोरदारपणे सुरु आहे.