

Virar Vehicle Fire Incident
खानिवडे : विरार पूर्वेकडील विरार-फाटा महामार्गादरम्यान असलेल्या पीरकुंडा जवळ बुधवारी (दि. २८) दुपारी मॅजिक गाडीला अचानक भीषण आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने ही गाडी घेऊन चालक दुरुस्ती साठी जात असल्याने गाडीत कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४८ टीवाय १०५७ क्रमांकाची मॅजिक गाडी चालक विरार येथील जीवदानी परिसरातून विरार-फाटा महामार्गाच्या दिशेने घेऊन जात होता. पीरकुंडा दर्ग्याजवळ आल्यानंतर गाडीतून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बॅटरीची वायर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गाडीने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने मोठे स्वरूप धारण केले आणि संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दरम्यान, चालक गाडी गॅरेजमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मॅजिक गाडी जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.