

Thane Uttarashiv River water pollution
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांमधून वाहणार्या उत्तरशीव नदीत रसायन सोडल्याने नदी फेसाळली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. मात्र सातत्याने या नदीपात्रात रसायनांचे प्रयोग केले जात असताना देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे या नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आले असून प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांना प्रदूषणाने प्रचंड ग्रासले आहे. गावांच्या वेशीवर सुरू झालेल्या केमिकलच्या गोडाऊनमधून दिवसाढवळ्या केमिकल सोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नदी पात्रात सोडण्यात येणार्या या केमिकलच्या सत्रांमुळे नदी कधी रंग बदलते, तर कधी फेसाळलेली दिसून येत आहे.
मात्र या प्रदूषणाच्या बाबतीत सातत्याने 14 गावांचे नाव पुढे येत असताना देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि लोकप्रतिनिधी या प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. 14 गावांमधून वाहणार्या या नदीचे पाणी थेट देसाई खाडीला जाऊन मिळते. मात्र नदी काठी चरायला येणार्या जनावरांचे अस्तित्व या पाण्यामुळे धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे 14 गावांतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रकारांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा कधी लक्ष देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
14 गावांमध्येअसलेल्या ठाकूरपाडा डोंगरावर रसायनांचे मोठमोठे अनधिकृत गोडाऊन सुरू करण्यात आले आहेत. नियम धाब्यावर बसवून सर्रास केमिकल नदी पात्रात टाकण्याचे काम सुरू आहे. तत्कालीन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ग्रामसेवकांसह प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्यांना धारेवर धरले होते. मात्र आता पुन्हा एकदा 14 गावांमध्ये प्रदूषणाचे प्रकार सुरू झाल्याने 14 गावांसाठी ते त्रासदायक ठरू लागले आहेत.