Thane Crime : पोलीस असला म्हणून काय झालं... निघून जा... नाहीतर फोडून टाकीन

डोंबिवलीत जीवघेण्या हल्ल्यातून पोलीस अधिकारी बचावला; पाच सशस्त्र टोळक्याचा शोध सुरू
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : पश्चिमेकडे असलेल्या जुन्या डोंबिवलीतील शिवमंदिर परिसरात गेल्या आठवड्यात रक्तरंजित घटना घडली. पाच जणांच्या सशस्त्र टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून रामनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोरा (49) हे थोडक्यात बचावले आहेत.

पोलीस असला म्हणून काय झालं... निघून जा... नाहीतर फोडून टाकीन, अशा धमक्या देत या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. या टोळक्यापैकी कारच्या चालकाने धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात पोलीस अधिकारी बोरा थोडक्यात बचावले असून कानाला गंभीर दुखापत झालेल्या या अधिकाऱ्यावर एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

crime news
Jalgaon Crime | जळगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! शनिपेठ पोलीस ठाण्यातच माजी नगरसेवकाला चोप; पोलिसांचा 'वचक' संपला का?

हल्लेखोर पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णूनगर पोलिसांनी खुनासह गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांमध्ये दोन बुलेटवरील चार जण आणि एक कारचा चालक अशा पाच जणांचा समावेश आहे. पोलिसांनी कारमधील हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.

या संदर्भात पोलीस अधिकारी लक्ष्मण बोरा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या आठवड्यात दिवसभरामध्ये पोलीस ठाण्यातील काम उरकून रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून जुनी डोंबिवलीतील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या घरी चालले होते. जुनी डोंबिवलीतील शिव मंदिराजवळील वळणावर समोरून एक दुचाकीस्वार वळण घेत होता.

crime news
Jalgaon News: चोपडा ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

वळण घेण्याचे सिग्नल दुचाकीला दिले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. म्हणून त्या दुचाकीस्वाराला वळण घेताना सिग्नल देत जा, असे पोलीस अधिकारी बोरा यांनी सांगितले. अनेक वाहने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. इतक्यात पाठीमागून आलेल्या कारमधील चालक मोठ्याने हॉर्न वाजवत होता.

पोलीस अधिकारी बोरा यांनी कारजवळ जाऊन चालकाला त्या दुचाकीस्वाराने केलेली चूक सांगण्याचा प्रयत्न करत आपण पोलीस अधिकारी असल्याची ओळख दिली. हे ऐकून कारचा चालक चवताळला.

तू पोलीस असला म्हणून काय झाले ? असा सवाल करत तू येथून निघून जा... नाहीतर तुला फोडून टाकीन, अशी त्याने पोलीस अधिकारी बोरा यांना धमकी दिली. हा प्रकार सुरू असतानाच तेथे दोन बुलेटवरून चौघे आले. कार चालकाला भावा काय झाले ? असे विचारत पाचही जणांनी घेरून पोलीस अधिकारी बोरा यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. याच दरम्यान कार चालकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने हल्ला केला.

तेच हत्यार गळ्यावर फिरले असते तर...

बचावाचा पावित्रा घेतल्याने पोलीस अधिकारी लक्ष्मण बोरा यांच्या कानास गंभीर दुखापत होऊन त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र तेच हत्यार गळ्यावर फिरले असते तर होत्याचे नव्हते झाले असते. अशाही परिस्थितीत रक्ताने भिजलेल्या अवस्थेत असतानाही पाच जणांच्या टोळक्याकडून त्यांना ठोसा-बुक्क्याने मारहाण सुरू होती. प्रसंगावधान राखून पोलीस अधिकारी बोरा यांनी त्यांच्या मोबाईलमधून व्हीडिओ शूटिंग सुरू केले.

हे पाहून बुलेटवरील एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळून त्यातील व्हीडिओ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळक्याने तेथून निघून पळ काढला. जखमी अवस्थेत पोलीस अधिकारी लक्ष्मण बोरा यांना एमआयडीसीच्या निवासी विभागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. तर हल्लेखोर अद्याप हाती लागले नसून पोलीस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news