Thane water diversion : ठाणे तहानलेले अन् पाणी गोदावरीला!

उल्हास-वैतरणेचे पाणी वळविण्याच्या हालचाली, नदीजोड प्रकल्पाचा सर्वे सुरू
Thane water diversion
Thane water diversionpudhari photo
Published on
Updated on

डोळखांब : दिनेश कांबळे

ठाणे जिल्ह्यातील उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील समुद्राला मिळणारे तब्बल ५४ टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी गोदावरी खोरे पाटबंधारे विभागाकडून शहापूर तालुक्यातील शाई धरण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भूगर्भ अन्वेषणाचे काम सुरू असल्याचा दावा शाई धरण शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. मात्र, स्थानिक तालुकेच पाण्यासाठी तहानलेले असताना शेकडो किलोमीटर दूर पाणी वळविण्याचा घाट कशासाठी, असा संतप्त सवाल आता शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

शाई धरण परिसरात मोठी यंत्रसामग्री आणून भूगर्भ अन्वेषण सुरू असल्याचे संघर्ष समितीच्या निदर्शनास आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत या कामाची माहिती घेतली. त्यानंतर नदीजोड प्रकल्पाच्या हालचाली समोर आल्याचा दावा समितीने केला आहे. उल्हास नदी खोऱ्यातून सुमारे ३५ टीएमसी, तर वैतरणा नदी खोऱ्यातून सुमारे १९ टीएमसी अतिरिक्त पाणी समुद्राला मिळते.

Thane water diversion
Mumbai Crime : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

हे एकूण ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. यासाठी शहापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यांत पाइपलाइन, लिफ्टिंग स्टेशन, पंपिंग स्टेशन आणि उदंचन विद्युत प्रकल्प उभारण्यासह शहापूरमध्ये काही छोटी धरणे बांधण्याचे नियोजन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि बदलापूर परिसरातील अनेक गावांना आजही दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहापूर तालुक्यात भातसा, वैतरणा, तानसा, मध्य वैतरणासारखी मोठी जलाशये असूनही अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. त्यामुळे स्थानिकांची तहान भागविण्याऐवजी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची गरज काय? असा सवाल संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.

Thane water diversion
Mumbai Crime : दुचाकी चोरीला ‘भंगार’ची जोड; चोरट्यांची मोडस ऑपरेंडी!

दरम्यान, शाई-काळू धरणांमुळे सुमारे ५४ गाव-पाड्यांतील १५ हजार नागरिकांच्या विस्थापनाचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्याच परिसरातील पाणी अन्य खोऱ्यात वळविण्याच्या हालचालींमुळे स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे.

भूगर्भ अन्वेषणाला ब्रेक

शाई धरण शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत सरखोत यांच्या नेतृत्वाखाली पांढरीचा पाडा येथे बैठक घेण्यात आली. नदीजोड प्रकल्पाबाबत गावागावांत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समितीच्या विरोधानंतर भूगर्भ अन्वेषणाचे काम थांबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

५४ टीएमसीवरून संघर्ष पेटणार

शहापूर तालुक्यावर आधीच विविध प्रकल्पांचे ओझे असून मोठ्या प्रमाणात शेतकरी विस्थापित झाले आहेत. त्यात नदीजोड प्रकल्पाची भर पडल्यास पाइपलाइन, रस्ते, पंपिंग हाऊस आणि विद्युत प्रकल्पांसाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर जमीन लागणार आहे. स्थानिकांना पाणी न देता त्यांच्या हक्काच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news