

ठाणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्यात पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत असे 18 तास अवजड वाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र, नियोजनाअभावी समस्या दूर न होता उलट गंभीर झाली. या वाहतूक कोंडीत अडकल्याने दहा वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना अठरा तास बंदीची अधिसूचना रद्द करीत शनिवारपासून अवजड वाहनांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (दिवसा सहा तास) पुन्हा परवानगी द्यावी लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत घोडबंदर रस्त्यावर दिवसा बंदी घालून रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश यंत्रणांना दिले होते. त्यानुसार ठाणे वाहतूक पोलिसांनी 18 सप्टेंबरपासून रात्री 12 ते पहाटे 6 यावेळेत अवजड वाहनांना बंदी घातली. यामुळे घोडबंदरची वाहतूक सुरळीत झाली मात्र मिरा-भाईंदर आणि पालघर जिल्ह्यातील वसई विरारमधील मुंबई - अहमदाबाद महामार्गावर अभुतपुर्व वाहतूक कोंडी होऊ लागली. नागरिकांना पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते. गुजरातमार्गे रात्री येणारी अवजड वाहने ही बंदी असल्याने सकाळी त्याच रस्त्यावर उभी करून ठेवली जात होती. त्यांच्यासाठी ट्रक पार्किंगची व्यवस्था नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत होती.
शुक्रवारी वर्सोवा - वसई फाटा दरम्यान वाहतूक कोंडीत पाच तास अडकून राहिलेल्या रुग्णवाहिकेतील दोन वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेत नवीन आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी नवीन वाहतुकीबाबतची सूचना काढली आहे.
वाहतुकीचे नवीन वेळापत्रक
घोडबंदर रोड, ठाणे जिल्ह्यात सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी
सकाळी 11.1 मिनिटपासून सायंकाळी 4.59 मिनिटापर्यंत वाहतुकीस परवानगी
सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनास बंदी
रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी
जिल्हाधिकार्यांच्या महत्त्वाच्या सूचना
अधिसूचनेच्या कालावधीत कसारा, शहापूर मुंबई मार्गिका, शहापूर नाशिक मार्गिका, वाशिद, भिवंडी आणि आवश्यक त्या ठिकाणी अवजड वाहनांना थांबविण्यासाठी व्यवस्था उपलब्ध आहे. अवजड (10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहनांना थांबविण्यासाठी नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील सुयोग्य ठिकाणी होल्डींग प्लॉटस सुनिश्चित करण्याबाबत संबंधित विभागांनी उपाययोजना करावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे आणि पालघर यांच्यासह महामार्ग सुरक्षा पोलिसांनी त्याचे संनियंत्रण करावे.