

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित कल्याण-शिळ महामार्ग वेगवेगळ्या कारणांनी वारंवार चर्चेत येत असतो. बारमाही आणि २४ तास वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या या महामार्गाला मुक्त करण्याचे धाडस अद्याप कुणीही केलेले दिसून येत नाही. तरीही या महामार्गावर पसरलेल्या अजस्त्र अजगराला उठविण्यासाठी या महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या पलावा सिटीतील संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारच्या सुमारास रस्त्यावर उतरून एल्गार केला.
कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याण फाटा ते पत्रीपूल, तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याण फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, जेष्ठ नागरिक, वाहनांचे चालक, प्रवासी, रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
दररोज दोन-अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. वाहतूक कोंडी, वेळ आणि इंधनाचा अपव्यय, एकच जागी तासन् तास थबकून धूर ओकणाऱ्या वाहनांमुळे परिसरात होणारे जीवघेणे प्रदूषण, या साऱ्या समस्या केवळ ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित कल्याण-शिळ महामार्गावर एकवटून आल्या आहेत. अशातच रविवारी या महामार्गावर असलेल्या पलावामधील रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. शासन/प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या रहिवाशांनी पलावा ते शिळफाट्या दरम्यान बाईकरॅली काढून जोरदार निदर्शने केली.
एखाद्या अजस्त्र अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या शासकीय यंत्रणांच्या बेपर्वा कारभारामुळे कल्याण-शिळ महामार्गाचा बट्ट्याबोळ झाला आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे शालेय बसगाड्या, रूग्णवाहिका, खासगी वाहने आणि दुचाक्या तासन्तास अडकून पडतात. जळणारे इंधन, लायलेन्सरमधून निघणारा धूर, जीवघेणे प्रदूषण, वेळेचा अपव्यय, आदी कारणांनी हैराण झालेल्या पादचारी, वाहनचालक, प्रवाशांसह महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांनी शासन/प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. तरीही व्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नसल्याने संतप्त पलावाकरांनी रस्त्यावर उतरून शासन/प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी या संदर्भात बोलताना दिली.