

ठाणे : दिवा या ठिकाणी दातिवली येथील तलावात बुडून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.10) रोजी सकाळी समोर आली.
कैलास विश्वकर्मा असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो तलावात कसा बुडाला, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दिवा पूर्वेच्या श्लोक नगर येथील सद्गुरू चाळीत विश्वकर्मा कुटुंबीय राहतात. त्यांचा मुलगा कैलास याचा मृतदेह दातिवली तलावात आढळून आला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्याचा मृतदेह तलावामधून बाहेर काढला. तसेच हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.