

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच येथे शिकाऊ आणि तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असतात. परंतु या रुग्णांसह डॉक्टरांना आवश्यक असलेली कॅन्टीन मागील चार ते पाच महिन्यापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही या कॅन्टीनसाठी दोन वेळा निविदेला मुदतवाढ देऊनही त्याला अल्प प्रतिसाद आल्याचेच चित्र आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात कॅन्टीनचे काम अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली अगदी ग्रामीण भागातून रोज 2200 ते 2500 रुग्ण हे ओपीडीवर उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत असतात. मागील काही महिन्यापासून येथील रुग्णालयाचा कायापालट सुरु झाला आहे. स्वच्छेतवर अधिक भर दिला जात आहे. तसेच येथील डॉक्टरांसाठी पंचतारीक हॉटेलला लाजवेल, अशा पध्दतीने हॉस्टेल देखील उभारण्यात आले आहे. त्यात येथील डॉक्टरांना किंवा रुग्णांना चांगले अन्न खाण्यास मिळावे या उद्देशाने येथे कॅन्टीन सुरु होते. परंतु त्याचा करार संपुष्टात आल्याने येथे चांगल्या दर्जाचे कॅन्टीन सुरु करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच ते कॅटींग लवकर डॉक्टर आणि रुग्णांच्या सेवेत द्यावे, यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच महापालिकेच्या आरोग्य विभागाने नव्याने निविदा काढली होती. सुरवातीला एकच ठेकेदार पुढे आल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली
निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची चिन्हे आहेत. आधीच हे कॅन्टीन सुरु करण्यास उशीर झालेला आहे. त्यात कॅन्टीन नसल्याने डॉक्टर व इतरांना बाहेर जाऊन अधिक पैसे देऊन खावे लागत आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीच्या कात्रीत हे कॅन्टीन अडकल्यास पुन्हा त्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.