

Titwala love jihad case
डोंबिवली : टिटवाळ्यात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पतीकडून सातत्याने होणाऱ्या मारहाणी, चारित्र्यावरचे आरोप आणि मुलांना वेगळे करण्याच्या प्रकारामुळे एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या मंडळींवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
तक्रारदार सोनी राजूप्रसाद गौड (वय 26) ही तरुणी मुंबईतील डॉकयार्ड रोड परिसरात राहत असताना शासकीय शाळेत दहावीत शिकत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या बाबू अन्वरअली सय्यदशी तिची ओळख झाली. प्रेमसंबंधातून 1 डिसेंबर 2018 रोजी कोर्टात विवाह झाला आणि तिचे नाव ‘सना बाबू अली सय्यद’ असे ठेवण्यात आले.
विवाहानंतर ती टिटवाळ्यात राहायला आली, मात्र काही दिवसांनी सासरच्या भायखळा येथील घरी गेली. येथे घरकाम आणि दिराच्या तिन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली. माहेरातील एका ओळखीच्या व्यक्तीशी रस्त्यावर बोलणे झाल्यामुळे भावजयीने तिच्याविरोधात चुकीचा समज पसरवला. त्यानंतर तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.
भायखळ्यात जवळपास वर्षभर पतीकडून मारहाण सहन केल्यानंतर, टिटवाळ्यात आल्यावरही तिची स्थिती बदलली नाही. मूल होत नसल्याचा बहाणा करून पती तिला घरात कोंडून मारहाण करत असे. नंतर दोन मुले झाल्यानंतरही पतीचे संशय आणि अत्याचार सुरूच राहिले. या काळात पतीला दारूचे व्यसन लागले व तो माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ करू लागला.
एका बिल्डरशी व्हॉट्सॲपवरील संभाषणाचा विपर्यास करून तिला घरात कोंडून मारहाण करण्यात आली. घटस्फोटाची इच्छा व्यक्त करताच पती भडकला आणि “मारून टाकेन, पण घटस्फोट देणार नाही” अशी धमकी दिली.
आईच्या घरी राहायला गेल्यानंतर, पती आणि मोठ्या दिराने तिला गंभीर धमक्या दिल्या. दिराने तर “चिरून कुकरमध्ये टाकून देऊ, कुणालाही समजणार नाही” असेही म्हटले. 4 ऑगस्ट रोजी पतीने दोन्ही मुलांना तिच्यापासून वेगळे केले. पतीकडून सातत्याने होणाऱ्या मारहाणीमुळे आणि मुलांना परत देण्यास नकार दिल्यामुळे अखेर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी पीडित महिलेला धीर देत तिच्या जबानीवरून गुन्हा नोंदवला असून, टिटवाळा तालुका पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे.