

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेतील चक्कीनाक भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील बारा वर्षाची मुलगी सोमवारी (दि.२३) संध्याकाळी चार वाजता घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाली होती. मंगळवारी या बेपत्ता मुलीचा मृतदेह पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बापगाव भागात सापडला. या घटनेनंतर खळबळ माजली आहे. अज्ञात कारणातून अपहरण करून या मुलीचा खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी एकीकडे कोळसेवाडीसह ग्रामीण पोलिसांकडून तपासचक्रांना वेग दिला आहे. तर दुसरीकडे क्राईम ब्रँचनेही समांतर तपास सुरू केला आहे.
सोमवारी सकाळी खाऊ घेण्यासाठी दुकानात जाते, असे सांगून मुलीने आईकडून वीस रूपये घेतले आणि घराबाहेर पडली. मुलगी थोड्यावेळात परत येईल, असे आईला वाटले. मात्र, उशीर झाला तरी मुलगी घरी येत नाही, म्हणून घरच्यांनी परिसरात, आपल्या नातेवाईक, तिच्या मैत्रिणींकडे शोध घेतला. मात्र, मुलगी कुठेही आढळून आली नाही. मुलगी शोधूनही सापडत नसल्याने भयभीत कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन मध्यरात्रीच्या सुमारास मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. आपल्या मुलीला कुणीतरी तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन, तिला फूस लावून किंवा कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला. ती कोठेही आढळून आली नाही. मंगळवारी सकाळी कल्याण-पडघा मार्गावर बापगाव हद्दीत कब्रस्तान परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पडघा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कल्याणसह भिवंडीमध्ये बेपत्ता मुलीची नोंद कोणत्या पोलिस ठाण्यात दाखल आहे, याचा तपास केला. त्यावेळी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एक नोंद असल्याचे पोलिसांना समजले. पडघा पोलिसांनी कोळसेवाडी पोलिसांना ही माहिती दिली. मुलीच्या पालकांना तातडीने कळविण्यात आले. पालकांनी आपल्याच बेपत्ता मुलीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट केले.
या मुलीचे अपहरण कुणी केले ? तिला बापगावपर्यंत कुणी आणले ? तिची हत्या कुणी आणि का केली ? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पडघा आणि कोळसेवाडी पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तपासचक्रांना वेग दिला आहे. या मुलीचे मारेकरी लवकरच हाती लागतील, असा पोलिसांचा कयास आहे.
दरम्यान, कल्याणमधून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह बापगाव हद्दीत आढळून आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू करण्यात आल्याचे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी सांगितले.