ठाणे : पुतळा ब्राँझचा की पितळेचा, हाच संशय!

फॉरेन्सिक अहवालाची उत्कंठा : ‘वेट बॅलन्स’ नव्हताच; स्ट्रक्चरल इंजिनीअरही दुर्घटनेला जबाबदार
राजकोट
राजकोट: पुतळ्याच्या आतमध्ये तो उभा राहण्यासाठी हे लोखंड वापरले. त्यामधील नटबोल्ट तुटून गेल्याचे दिसत आहे.pudhari news network
Published on
Updated on
राजकोट : गणेश जेठे

राजकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना खरेच ब्राँझ धातू वापरला का? ब्राँझ या मिश्र धातूसोबत शिसे, जस्त असे पंचधातू मिश्र केले का? की पितळेचाच जास्त वापर झाला याबाबत शिवप्रेमी आणि शिल्पतज्ज्ञांनीही संशय व्यक्त केला आहे. तपासी यंत्रणांनी तर हे शोधण्यासाठी कंबर कसली असून फॉरेन्सिक विभागाच्या अहवालाची उत्कंठा ताणली गेली आहे. केवळ 24 वर्षे वयाच्या अननुभवी शिल्पकाराने एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली खरी; परंतु त्याला अनुभव नसल्याने या पुतळ्याचा ‘वेट बॅलन्स’ सांभाळता आला नाही, असे आता पुढे आले आहे.

राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांतील भेटी, पाहणी आणि आंदोलने आता मंदावली आहेत. आता सर्वांचेच लक्ष तपास यंत्रणांकडे लागले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे पुतळा कसा बनवला, त्यासाठी कोणत्या धातूचा वापर करण्यात आला, आतील लोखंडाचा वापर किती आणि कसा केला? आतून, बाहेरून दोन्ही बाजूने कास्टिंग पार्टला वेल्डिंग केले का, या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणा तज्ज्ञांच्या मदतीने शोधत आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अधिकार्‍यांनी दोनवेळा राजकोटवर येऊन कोसळलेल्या पुतळ्याच्या अवयवांचे काही नमुने गोळा करून नेले आहेत. कास्टिंगसाठी वापरलेला धातू, पुतळ्याच्या आत वापरलेल्या आयबीमचे नमुने, नटबोल्टचे नमुने, वेल्डिंगसाठी वापरलेले मटेरियल याची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून होणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा पोलिस यंत्रणेला आहेच. या अहवालातून हे स्पष्ट होणार आहे की, हा पुतळा बसविल्यानंतर तो पंचधातूचा पुतळा असल्याचे शिल्पकाराने जाहीर केले होते त्याप्रमाणे तो होता का?

खरेच पंचधातू वापरला का?

जगभरातले बहुतांशी पुतळे ब्राँझ धातूने बनविले जातात. इथे पंचधातूचा वापर झाल्याचे म्हटले होते. तांबे आणि कथिलचे मिश्रण केले की ब्राँझ हा मिश्रधातू तयार होतो. यात 80 टक्के तांबे, त्यात शिसे, जस्त अशा धातूंचा वापर केला की त्याला पंचधातू संबोधले जाते. काहीवेळा पितळेचा वापरही ‘सोय’ म्हणून केला जातो. इथे खरेच पंचधातू वापरला गेला की पितळेचा वापर केला गेला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यात पुन्हा अनेकांचे असे म्हणणे आहे की जेव्हा प्रत्यक्षात पुतळा उभारला गेला तेव्हाचा पुतळ्याचा रंग आणि जेव्हा पुतळा कोसळला तेव्हाचा रंग यामध्ये काहीसा बदल दिसत होता. आता याबाबतचा नेमका अहवाल फॉरेन्सिक विभागच सरकारला सादर करणार आहे.

राजकोट
Chhatrapati Shivaji Maharaj Statue | राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे आहे तरी कोण ?

जयदीप आपटे लवकरात लवकर हवा आहे

नौदलाने पुतळा उभारण्याची वर्कऑर्डर शिल्पकार जयदीप आपटे याच्या कंपनीला दिली होती आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची जबाबदारी चेतन पाटीलकडे होती. त्यामुळे पुतळ्याचे बाह्य रूप आणि अंतर्गत मजबुतीचे काम या दोन्ही जबाबदार्‍या या दोघांच्याही होत्या. परंतु त्या गांभीर्याने पाळल्या गेल्या नाहीत हे आता पुढे आले आहे. म्हणूनच दोघांनी संगनमताने निकृष्ट काम केले, अशी फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाने मालवण पोलिसात नोंदवली आहे. चेतन पाटील पोलिसांना सापडला आहेच; परंतु जयदीप आपटे हा महत्त्वाचा आरोपी लवकरात लवकर पोलिसांना हवा आहे. कारण अनेक प्रश्नांची उत्तरे जयदीप आपटे याच्याकडे आहेत.

‘वेट बॅलन्स’ सांभाळला नाही : दाजी पांचाळ

दाजी पांचाळ हे कुडाळस्थित अनुभवी शिल्पकार असून त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील महनीय व्यक्तींचे अनेक पुतळे उभारले आहेत. त्याशिवाय पुण्यातील महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळाही त्यांनीच उभारला आहे. त्यांचे स्पष्ट मत आहे की, जयदीप आपटे या कलाकाराने पुतळ्याचा ‘वेट बॅलन्स’ सांभाळला नाही. उभा असलेला पुतळा उभारला हे योग्य आहे. पण हातात अशी उगारलेली तलवार द्यायची आवश्यकता नव्हती. कारण शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहात उभे आहेत. त्याऐवजी मागील बाजूस शेला दाखवला असता तर ‘वेट बॅलन्स’ झाले असते. पुतळ्यासाठी नेमका ब्राँझ धातू वापरला का याबाबत संशय आहेच; परंतु त्या कलाकाराने कास्टिंग कुठे केले याची अद्याप माहिती बाहेर पडलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुटे भाग जोडल्यानंतर बाहेरून वेल्डिंग आणि फिनिशिंग केले. परंतु आतून वेल्डिंग करावे लागते. ते त्यांनी केले नसावे, म्हणून ही दुर्घटना घडली. शिल्पकाराची भूमिका शिल्प बनविणे ही आहे. परंतु पुतळ्याच्या आतमध्ये जे लोखंडाचे काम आहे ते स्ट्रक्चरल इंजिनिअरने करायचे असते. ते खूपच कमकुवत केल्याने ही दुर्घघटना घडल्याचे दाजी पांचाळ यांनी स्पष्ट केले.

पुतळ्याचे 650 सुटे भाग

जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांनी हा पुतळा जरी उभारला असला तरी त्यांना डिझाईनसाठी मूळचे मालवणचे आणि मुंबईतील डिझायनर सतीश देसाई यांनी मदत केली. कारण नौदलाकडून ही जबाबदारी सतीश देसाई यांना देण्यात आली होती. थ्रीडी स्कॅनिंग आणि डिजिटल क्लोन बनविण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर 650 सुटे भाग बनविण्यात आले. हेच भाग गाडीमधून मालवणात आणून ते नंतर जोडण्यात आले, अशी माहिती पुतळा बनविल्यानंतर जाहीरपणे सतीश देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. यावरून लॉस्ट वॅक्स या पूर्वीच्या पद्धतीचा वापर न करता प्रेस कास्टिंगचा वापर करून शिल्पकाराने शॉर्टकटचा मार्ग पत्करला असावा असे दिसते.

प्रेस कास्टिंगचे ज्ञान आपटेला नव्हते : नामानंद मोडक

हा पुतळा लॉस्ट वॅक्स पद्धतीचा वापर न करता प्रेस कास्टिंगचा शॉर्टकट वापरून बनविला गेला. मुळात ज्याला हे काम दिले त्याला त्याचा अनुभव नव्हताच. त्यांनी तो बनविताना गांभीर्याने घेतले नाही. अगदी आपल्याकडे नरकासुर बनवितात तशा प्रकारचे लोखंड वापरल्याचे दिसते आहे. शिल्पकाराइतकाच स्ट्रक्चरल इंजिनिअर या घटनेला कारणीभूत आहे. त्याशिवाय इतक्या नवख्या कलाकाराला इतके मोठे जबाबदारीचे काम दिलेच कसे हाच खरा प्रश्न आहे, असे कणकवतील शिल्पकार नामानंद मोडक यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news