

नेवाळी : शुभम साळुंके
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची विशेष परंपरा आहे. कोकण प्रांतात गणेशोत्सवाचा उत्साह देखील दिसून येत आहे. गावागावात गणपती बाप्पांचे आगमन देखील झाले आहे. परंतु कोकण प्रांतात असलेल्या ठाणे तालुक्यातील बाळे, वडवली या गावात गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून गणपतीं बाप्पांचे गणेश चतुर्थीला पुजनचं केले जात नाही. या दोन्ही गावांच्या मध्यस्थानी असलेल्या प्राचीन स्वयंभू गणपती मंदिरामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थ घरघुती गणपती पूजन गेल्या शंभर ते दिडशे वर्षांपासून गणेश चतुर्थीला करत नाहीत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. कोकण प्रांतात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील ठाणे जिल्ह्यात दोन अशी गाव आहेत, कि जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. या गावांची नाव बाळे आणि वडवली अशी आहेत.
ठाणे तालुक्यात असलेल्या या गावामध्ये गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जात नाही. या गावांमध्ये सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत. मात्र या पैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. याचं कारण म्हणजे या गावांच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आहे.
गावातील रहिवाशांनी गावातील याच गणपतीचं पूजन करावं, असा दंडक येथे शेकडो वर्षांपासून पाळला जात आहे. घरी गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये अनेक अडथळे येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. या गावाता अजूनही घरगुती गणपती आणला जात नाही. घरगुती गणपती ऐवजी गणेशोत्सवादरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो.
यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावातून किर्तनकार प्रवचनकार मंडळी मोठ्या संख्येने मंदिरात येत असते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष या मंदिरात साजरा केला जातो. दरवर्षी स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदारांच्या उपस्थितीत या गणपती मंदिरात महाआरती असते. तर भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात दर्शनासाठी असते.