

आसनगाव/डोळखांब : शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणार्या अघई विभागातील चक्कीचा पाडा येथे दूषित पाण्यामुळे तब्बळ 18 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत मेडिकल कॅम्प बसवण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाड्यांमध्ये 22 घरांची लोक वस्ती असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे.
गावामध्ये दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी आरोग्य विभाग मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. तर येथील पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने येथील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.
आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू असून या गावात आरोग्य विभागामार्फत आरोग्य कॅम्प बसवण्यात आल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणार्या चक्कीचा पाडा येथील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आरोग्य केंद्रातील कर्मचारी ठाण मांडून
या घटनेमुळे बुधवार पासुन अघई आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांचे पथक ठाण मांडुन असल्याने हळुहळू रूग्णांची परिस्थिती सुधारत असल्याचे डॉ. रमेश जाधव यांनी सांगितले. यापैकी सद्या शहापूर उपजिल्हा रूग्णालयात सात रूग्ण दाखल असून गावात 9 रूग्णांवर तातडीने उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती सुखरूप असून पाणी नमुना तपासणी साठी दिला आहे. दोन दिवसात तपासणी अहवाल आल्यानंतर नेमकी कशा पासुन लागण झाली हे स्पष्ट होणार असल्याने, सद्या याबाबत नेमकि माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
चक्कीचा पाडा येथे आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू असून या ठिकाणी आरोग्य कॅम्प बसविण्यात आला आहे.
डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी
सर्व रुग्णांचे शौचाच्या ठिकाणचे नमुने घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत याशिवाय सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
डॉ. ओमकार धोटे, प्राथमिक आरोग्य केंद्र अघई