Thane Crime : धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलाने केली जन्मदात्याची निर्घृण हत्या

पिसवली परिसरातील धक्कादायक घटना; मुलाला अटक
Thane Crime News
Thane Crime News
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण-शिळ महामार्गावरील पिसवली परिसरात शनिवारी (दि. १०) मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर आणि स्वतःच्याच पित्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयाने पछाडलेल्या एका मुलाने विकृतीची सर्व सीमा ओलांडली. संशयाच्या आगीत जळणाऱ्या या मुलाने जन्मदात्या पित्याच्या छातीत चाकू खुपसून त्यांची निर्घृण हत्या केली. मुरली शहा (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विनोद शहा (वय ३२) या निर्दयी मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आरोपी विनोद शहा (वय ३२) याच्या मनात मागील काही दिवसांपासून पत्नी आणि वडील मुरली शहा यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. याच संशयावरून घरात सातत्याने वाद होत असत. शनिवारी मध्यरात्री हा वाद पुन्हा विकोपाला गेला, ज्यामुळे विनोदचा संताप अनावर झाला.

रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातील धारदार चाकू उचलून मुरली शहा यांच्यावर सपासप वार केले. हल्ल्यादरम्यान मुरली यांनी आरडाओरडा करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने त्यांच्यावर वर्मी वार सुरूच ठेवले. या हल्ल्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुरली शहा हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले आढळले, तर आरोपी विनोद हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन तिथेच उभा होता. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवून निर्दर्यी मुलाला अटक केली. पित्याला ठार मारण्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुरली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूग्णालयाकडे पाठवून दिला. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news