ठाणे : पहिल्या पावसातच ठाण्यात सहा वृक्ष उन्मळून पडले

ठाणे : पहिल्या पावसातच ठाण्यात सहा वृक्ष उन्मळून पडले
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; शहरात गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पहिल्याच पावसानंतर शहरात सहा ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, त्यात दोन ठिकाणी वृक्ष पडून घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झालेली. पण  यानिमित्ताने शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

१०६ धोकादायक वृक्ष 

ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक ठरविले होते. त्यापैकी सुकलेल्या अवस्थेत असलेली ८० वृक्ष काढून टाकली होती. असे असतानाही गुरुवारी सायंकाळी झालेल्या पहिल्या पावसानंतर शहरात सहा ठिकाणी वृक्ष पडण्याच्या तर चार ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.

तीन हात नाका सिग्नल जवळील सेवा रस्त्यावर लखानी इस्टेट समोर रस्त्यावर,  बाळकुम येथील राम मारुती नगरमधील रुणवाल टॉवर समोरील,  राबोडी येथील सरस्वती शाळेजवळील,  खारेगाव येथील अमृतांगण सोसायटी, फेज – २ मधील बिल्डिंग नंबर- ८ समोरील रस्त्यावरती वृक्ष पडले. तर कळवा पूर्व येथील भास्कर नगरमधील प्रगती मित्र मंडळ समोर राहणारे राम नारायण सिंग यांच्या घरावर वृक्ष पडले. यात घराचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिवा येथील गणेश नगरमधील गणेश कृपा चाळीमधील दोन घरांवर वृक्ष पडले. त्यामध्ये दिनेश रमेश सोनवणे आणि लीना विश्वास खरे यांच्या घरांचे पत्रे तुटून नुकसान झाले. या घटनेही कोणालाही दुखापत झालेली नाही. या सर्वच ठिकाणी पडलेले वृक्ष आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने हटविण्याचे काम केले आहे.

चार ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या

नौपाडा येथील भास्कर कॉलनीमधील कर्वे रूग्णालयाजवळील रस्त्यावरती वृक्षाची फांदी पडली. ठाणे महापालिकेच्या गेट नंबर एक जवळ वृक्षाची फांदी तुटून लटकत होती. ही फांदी कापून बाजूला करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयजवळ वृक्षाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती. नौपाडा येथील वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास बिल्डिंग समोर रस्त्यावरती वृक्षाची फांदी पडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news