

डोंबिवली : कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार (४७) हा पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण (चाळे) करत असे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी या वासनांध मुख्याध्यापकाला येथेच्छ बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील निळजे गावात जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेत ३ पुरूष शिक्षक, तर २ महिला शिक्षिका आहेत. या शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण (चाळे) सुरू केले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर या विद्यार्थीनीने सारा प्रकार आईला सांगितला. आपल्या मुलीवर गुदरलेले प्रसंग ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आई-वडिलांनी निळजे गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख ॲड. मुकेश भोईर यांच्या हा सारा प्रकार कानावर घातला. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांना कळविले. ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्यानंतर जमलेल्या संतप्त जमावाने शाळेचा वासनांध मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याला येथेच्छ चोप देऊन स्थानिक मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२), (एफ), ६४ (२), (आय), ६५ (२) सह पोक्सो कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८ अन्वये शनिवारी गुन्हा नोंदवून आरोपी महेंद्र खैरनार याच्यावर अटकेची कारवाई केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रियांका सादळकर अधिक तपास करत आहेत.