

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सोमवारी (दि.21) रोजी सकाळी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील उद्यान परिसरात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या पोलिसांना यावेळी पोलीस पथकाने आदरांजली वाहत अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते 'स्मृती स्तंभाला' पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथकाने हवेत गोळीबार करून शहिदांप्रती आदरांजली वाहिली. कार्यक्रमास जिल्हयातील शहीद पोलीस कुटूंबियांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून प्रेरणा मिळून कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, याकरीता हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.