

ठाणे : ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या विकासकामांमुळे वाढलेले प्रदूषण आणि वातावरणात झालेला अचानक बदल, सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि रात्री थंडी यामुळे ठाणेकर अक्षरशः बेजार झाले आहेत. घशाच्या तक्रारी, सर्दी आणि छातीत कफ भरल्याने खोकून खोकून नागरिकांचा जीव बेजार झाला आहे. सर्दी, खोकला, घशाचा त्रास तसेच तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. श्वसनाच्या आजारांचा विळखा वाढला असल्याने नोकरदार वर्गाने पुन्हा मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे.
दिल्ली, मुंबईनंतर ठाणे शहरात देखील हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळल्याने ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दरम्यान, ठाणे शहरात मागील काही दिवस थंड वातावरण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे.
ठाणे शहरातील वाढती वाहने आणि इमारतीची बेसुमार बांधकामे यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असल्याने ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्याभरापासून अनेकांना सर्दी, खोकल्यासह घसा बसला आहे. शहरातील विविध भागातील खासगी दवाखान्यांमध्ये दररोज 50 ते 60 रुग्ण हे सर्दी, खोकला आणि तापाचे आहेत.
पालिकेच्या कळवा आणि सिव्हिल रुग्णालयात देखील याच आजरावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून हात वारंवार धुवावे, स्वच्छता पाळावी. फळे, भाज्या आणि पौष्टिक आहार घ्यावा, गरम पाणी घ्यावे आणि शक्य असल्यास मास्कचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेने हेल्पलाईन 8657887101 या व्हॉट्स अँप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
हवेची गुणवत्ता 150 वर पोहोचली
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वांत कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक, पंधरवड्यानंतर 150 एवढा नोंदवण्यात आला आहे.
घोडबंदरची हवा सर्वात जास्त खराब
शहरात वाहनांची वर्दळ, इमारती बांधकामे, मेट्रोची कामे, रस्त्याचे खोदकाम यामुळे घोडबंदर परिसरातील हवा आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदरमध्ये सर्वात जास्त खराब हवा असल्याचे समोर आले आहे.
श्वसनाच्या लक्षणे वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावेत. गरम पाण्याने वाफ घ्यावी आणि गुळण्या कराव्यात. धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा, बाहेर पडताना मास्क वापरावे.
डॉ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी