

ठाणे : ठाणे रेल्वे प्रशासनाने उभारलेल्या प्रतीक्षा कक्षामध्ये दिवसेंदिवस अस्वच्छतेच्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. ठाणे रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दुसरे प्रतीक्षा कक्ष प्लॅटफॉर्म 1 वर उभारले होते. मात्र अवघ्या 2 महिन्यातच प्रतीक्षा कक्षात अस्वच्छतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
प्रतीक्षा कक्षाजवळील परिसर तसेच कक्षाच्या स्वच्छतागृहाचे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात साचत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दरदिवशी घाणीचा सामना करावा लागत आहे. तसेच ठाणे रेल्वे स्थानक स्वच्छ राहत नसल्यामुळेच अवघ्या 2 महिन्यातच वेटिंग रूम खराब झाल्याचे दिसून येत आहे.
प्रतीक्षा कक्षाचा वापर करणाऱ्या प्रवाशाने कक्षाचे शौचालय किती अस्वच्छ असून तिथे रेल्वे स्थानकावरील स्वच्छता- साफसफाई वेळीच होत नसल्याचे सांगितले. अलीकडील महिन्यांमध्ये ठाणे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 1 वर वेटिंग रूम उभारले; परंतु वेटिंग रूमच्या स्वच्छतागृहाची आणि रूमच्या आजूबाजूच्या परिसराची नीट दक्षता न घेतल्याचे आढळून येते. बऱ्याचवेळा वेटिंग रूम बाजूच्या जागेत प्रवाशांची वर्दळ असते. त्याच जागी रेल्वे प्रशासनाने कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांकडून वेटिंग रूमच्या स्वच्छता- गृहाचे सांडपाणी सोडून ठेवले.
कित्येकदा सोडलेल्या सांडपाण्याचा एकाच जागी साठा होतो व साठलेल्या पाण्यामुळे त्या जागेवर दुर्गंधी पसरते. बऱ्याचवेळा प्रवाशाने या परिस्थिती संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ परिसर स्वच्छ करू असे सांगण्यात आले; परंतु अजूनही परिसर स्वच्छ करण्यात आलेला नाही.
योग्य नियोजनाअभावी सांडपाणी इतर भागात पसरले जाते. या परिस्थितीवर अशा अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारांना रेल्वे स्थानकावरील कंत्राट देता कशाला? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. रेल्वे स्थानकावर बहुतांश काम कंत्राटदारांकडून अर्धवटपणे केल्याचे आढळते. प्लॅटफॉर्म आणि स्टेशनवर इतर ठिकठिकाणी अर्धवट काम करून ठेवल्याने परिसरात कचरा निर्माण होतो.
परंतु प्रशासन या परिस्थितीकडे दुर्लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान वाढलेली दुर्गंधी पाहता, रेल्वे प्रशासनाने याठिकाणी योग्य कंत्राटदार निवडावे आणि कंत्राटदारांकडून कायमस्वरूपी काम पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रतीक्षागृहाची त्वरित स्वच्छता करावी
स्टेशनवरची अस्वच्छता पाहता प्रतीक्षा कक्षाच्या या भागात पाणी साठलेले असते. तरीही स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता होत नाही. रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील प्रतीक्षागृहाची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.