

ठाणे: ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार शगुप्ता अन्सार हुसेन अन्सारी यांच्या पती मोहम्मद तारीख खान यांचा घरात टीव्ही लावण्याच्या विरोधावरून झालेल्या वादात रागाच्या भरात घरातील भाजी कापण्याच्या चाकूने तक्रारदार शगुप्ता , मुलगी आणि नात यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तक्रारदार शगुप्ता अन्सार हुसेन अन्सारी ( 39) या आपल्या पती व मुलींसह रबोडी येथे राहतात. त्या काही दिवसांपूर्वी मुलींसह माहेरी आल्या होत्या. त्यांच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. 25 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात टीव्ही पाहण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला.
वडील मोहम्मद तारीख खान यांनी टीव्ही लावण्यास विरोध करत कुटुंबीयांना शिवीगाळ केली. यावेळी आईने विरोध केल्याने ते अधिक संतापले. रागाच्या भरात त्यांनी घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून पत्नीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी फिर्यादी शगुप्ता यांनी आईला वाचवण्यासाठी पुढे येताच त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या कोपरावर वार करण्यात आला. तसेच त्यांच्या मुलगी तुबा हिच्याही हातावर वार करून तिला जखमी करण्यात आले.
या हल्ल्यात तिघी जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोहम्मद तारीख खान यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.