

ठाणे : स्मार्ट ठाणे अशी ओळख सांगणाऱ्या ठाणे शहरात प्रभाग क्रमांक 13 मधील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे अक्षरशः तुटले आहेत. 10 शौचालयांपैकी केवळ 2 शौचालयांनाच दरवाजे असल्याने लाडक्या बहिणांना शौचालयांमध्ये गेल्यावर अब्रू वाचवण्यासाठी अक्षरशः प्लायचा आधार घ्यावा लागत आहे. ठाणे महापालिकेत ठाकरे गटाचे निवडणून आलेले एकमेव नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र या ठिकाणी ठाकरे गटाचा मी एकमेव नगरसेवक असल्याने प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवक खुस्पे यांनी केला आहे.
तब्बल 5 हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था अक्षरशः बिकट स्वरूपाची आहे. शहरात अनेक ठिकाणी शौचालयांची अवस्था अतिशय खराब असून नागरिकांना याच खराब आणि मोडकळीस आलेल्या शौचालयांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. प्रभाग क्रमांक 13 मध्ये तर सार्वजनिक शौचालयांची अवस्था तर अतिशय खराब असून यांना शौचालये म्हणावी की नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. हा झोपडपट्टीचा परिसर असल्याने या ठिकाणी नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो.
महापालिकेने या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सुविधा करून दिली असली तरी, शौचालये एकदा बांधून झाली कि पुन्हा त्या शौचालयांकडे बघण्याची तसदी देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत नाही. या परिसरात बांधण्यात आलेली शौचालये अतिशय खराब असून इथल्या शौचालयांचे दरवाजे अक्षरशः तुटले आहेत. त्यामुळे या शौचालयांमध्ये जावे कि नाही असा प्रश्न या परिसरातील महिलांना पडला आहे.
ठाण्यात स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोट्यवधींचे प्रकल्प सुरु आहेत. शहरातील सुशोभीकरण आणि रंगरंगोटीवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर यामध्ये शौचालयांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला असतानाही या भागात हा खर्च झाला कि नाही? आणि झाला असेल तर झालेला हा खर्च गेला कुठे असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करून निवडणून आलेले ठाकरे गटाचे ठाणे महापालिकेतील एकमेव नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला असून यामध्ये त्वरित लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांची मते घेऊन निवडणून येणारे स्थानिक लोकप्रतिनिधीनी एवढ्या वर्षात केले काय असा प्रश्न शहाजी खुस्पे यांनी उपस्थित केला आहे.