

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात आता काँग्रेस सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस ठाणे शहर - जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाणे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात 150 निष्ठावंत इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेसची संसदीय समिती घेणार असल्याची माहिती ठाणे काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून 33 प्रभागांमध्ये 131 नगरसेवक निवडून येणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी इच्छुकांची पहिली पसंती काँग्रेसलाच आहे. या अनुषंगाने काँग्रेसकडे उमेदवारांची रीघ लागली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसकडे 150 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी 18 डिसेंबर रोजी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे प्रभारी अतुल लोंढे, विधानसभा प्रभारी श्रीरंग बर्गे, चंद्रकांत पाटील, अबिद खान तसेच काँग्रेसच्या जिल्हा निवड समितीतील सदस्यांच्या उपस्थितीत ठाणे काँग्रेसचे मुख्य कार्यालय येथे घेण्यात येणार आहेत. तरी सर्व इच्छुकांनी आपली व्यक्तीगत माहिती व प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.