

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. जागावाटपाच्या चर्चेत 227 पैकी जवळपास 142 जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे एकमत झाल्याचे समजते. यापैकी भाजपच्या वाट्याला 90 तर शिंदे गटाकडे 52 जागा आहेत. उर्वरित 85 जागांबद्दल पुढच्या फेरीत चर्चा होणार असल्याचे कळते. सहमती झालेल्या 142 जागांपैकी बहुतांश वॉर्ड हे मागील निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे असल्याचे समजते. मंगळवारी महायुतीच्या पहिल्या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली.
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रिपाइंने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला महायुतीतून बाहेर ठेवण्यात आले. महायुतीने 150 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. वादग्रस्त जागांचा तिढा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवरून सोडविला जाणार आहे.
नव्वदीचा शिंदे गटाचा आग्रह
मागील निवडणुकीत भाजपने 82 जागा मिळविल्या होत्या. यावेळी भाजपने 150 जागांवर दावा केला आहे. तर, उर्वरित जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. शिंदे गटाने मात्र किमान 90 जागांवरचा आग्रह कायम ठेवला आहे.
मंगळवारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक भाजपच्या दादर येथील कार्यालयात पार पडली. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसला या बैठकीपासून लांब ठेवण्यात आले. बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर उपस्थित होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे उपस्थित होते. त्याआधी भाजप आणि रिपाइंची बैठक झाली. बैठकीनंतर आशिष शेलार म्हणाले, देशाचा शत्रू दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या व्यक्तीसोबत मांडीला मांडी लावून बसण्याची भाजपची इच्छा नाही.