

ठाणे : ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. 44 लाख 66 हजार रुपये किंमत असलेले हे ड्रग्ज तस्करी करण्यास आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी डायघर आणि कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या ड्रग्ज तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलीस दलाकडून ड्रग्ज विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ड्रग्ज तस्करीवर करडी नजर पोलिसांनी रोवली होती. दरम्यान, एक जण एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी डायघर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शीळफाटा येथे पोलीस पथकाने सापळा लावला. एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 20.1 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी 4 लाख 2 हजार रुपये किमतीचे हे ड्रग्ज जप्त करीत मोहम्मद हानिफ शेख (25) यास अटक केली. त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 ऑक्टोबर रोजी केली. एक तस्कर कळवा नाका येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कळवा नाका येथे सापळा लावून एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 203.2 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. 40 लाख 64 हजार रुपये किंमत असलेले हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त करीत ड्रग्ज तस्करास अटक केली.
इरफान नूरमोहम्मद शेख (47) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या दोन्ही गुन्ह्यात एकूण 44 लाख 66 हजाराचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून हे ड्रग्ज कोठून आणले होते व कोणास विक्री करण्यात येणार होती याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.