

Gram Panchayat Plastic Ban
ठाणे : प्लास्टिकमुक्त जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा परिषद अॅक्शन मोडमध्ये आली असून, ग्रामीण भागात प्लास्टिक वापरावर निबंध घालण्यासाठी ग्रामपंचायतींना काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिले आहेत. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्लास्टिक मुक्त ग्रामही मोहीम राबविण्यात येणार असून, ५ जूनपर्यंत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
ज्या प्लास्टिकच्या वस्तूंचा एकदाच वापर होणार असून, नंतर त्या निरुपयोगी ठरणार आहेत अश्या सिंगल युज प्लास्टिक वस्तु वापरावर पर्यावरण, वन व बातावरणीय बदल केंद्राने बंदी आणली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे म्हणाल्या की, प्लास्टिक मुक्त गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपातळीवर सामूहिक कृती गरजेची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी होणे आवश्यक आहे.
ही मोहीम केवळ एक उपक्रम न राहता, प्लास्टिक मुक्त ग्राम करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रमोद काळे यांनी सांगितले की, या मोहिमेंतर्गत प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
विशेषतः 'मासिक पाळी व्यवस्थापन दिन', 'थीम एक पृथ्वी, एक आरोग्य' या उपक्रमांद्वारे शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे यामधून महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. माध्यमांद्वारे आणि स्थानिक सहभागातून या मोहिमेचा मोठा प्रभाव पडेल, असा विश्वास आहे.
प्लास्टिक कॅरीबॅग, पॉलिथिन (७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी), प्लास्टिकच्या ईयर बड्स, फुग्यासाठी प्लास्टिकच्या काठ्या, प्लास्टिकचे ध्वज, मिठाईच्या प्लास्टिकच्या काड्या, आइस्क्रीमसाठी प्लास्टिकच्या काड्या, धर्माकोलच्या सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच प्लॅस्टिक प्लेट्स, कप, ग्लास, काटे, चमचे, स्ट्रॉ, ट्रे, फॉइल पॅकेजिंग बॉक्स, निमंत्रण पत्रांसाठी फॉइल, सिगारेट पॅकिंग करण्यासाठी वापरलेले फॉइल, १०० मायक्रॉनपेक्षा पातळ पीव्हीसी आणि प्लास्टिक बॅनर इत्यादींचा समावेश आहे.