

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावात नशेखोर मित्रांची ओली पार्टी सुरू होती. दारूची पार्टी रंगात आली असतानाच आपापसात शिवीगाळ झाल्याने मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात एकाने देशी कट्ट्याने गोळी झाडून राजन उर्फ जानू येरकर याचा जागीच मुडदा पाडला. या घटनेनंतर तालुका पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अवघ्या काही तासांतच अटक केली. यातील परवेज शेख आणि सुनिल वाघमारे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. यातील चारपैकी तिघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Thane News
कल्याण जवळच्या ग्रामीण भागातील म्हारळ गावात असलेल्या सूर्यानगर परिसरात रोहित भालेकर, परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर हे पाच नशेखोर दारु पीत बसले होते. दारु पार्टी सुरु असताना त्यांच्यात शिवीगाळ झाल्याने राजन आणि एका मित्रामध्ये वाद झाला. याच दरम्यान संतापलेल्या रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला खोचलेल्या देशी कट्ट्यातून राजन येरकर याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात राजन येरकर हा घटनास्थळीच ठार झाला. Thane News
या प्रकरणी टिटवाळ्यातील तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथकाने रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अटक केली. मात्र, या प्रकरणातील सुनिल आणि परवेज हे दोघे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर म्हारळ परिसरात एकच खळबळ माजली आहे.
हेही वाचा