ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील क्रीडांगणाचा गैरवापर नाही
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणाचा गैरवापर या मथळ्याखाली दैनिक पुढारीने 12 फेब्रुवारीच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. तथापी क्रीडांगणाचा गैरवापर केला जात नसून रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे स्पष्टीकरण डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीने दिले आहे.
या संदर्भात स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा प्रमुख राहूल पाल यांनी खुलासा वजा स्पष्टीकरणाचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. प्रसारित केलेल्या वृत्तासंदर्भात स्पष्टीकरण देताना पाल यांनी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी संदर्भात माहिती सादर केली आहे. सदर क्रीडा संकुल मिलापनगर परिसरात आहे. अनेक वर्षांपासून घेतलेले अथक परिश्रम आणि कायद्यानुसार अधिकारात आलेल्या या भूखंडाचे सुसज्ज व अद्यावत असे क्रीडांगण संस्थेने स्वतः आर्थिक भार सोसून उभारले आहे. डोंबिवलीकरांना एकत्र आणावे, देशाची भावी पिढी सुदृढ रहावी, खेळाडूंना खेळाच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागू नये, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट खेळाडू तयार करणे, हाच केवळ त्यामागचा संस्थेचा उद्देश आहे. केवळ पैसा मिळवणे हा हेतू मुळीच नाही.
क्रिडांगणाचा एकंदरीत खर्च जसे क्रिडांगणाची देखभाल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रशिक्षकांचे वेतन, इत्यादी खर्च देखील क्रीडांगणाएवढाच अवाढव्य असल्याने क्रीडांगण नि:शुल्क वापरासाठी देणे शक्य नाही. हे क्रीडा संकुल कायद्याचे तंतोतंत पालन करते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रात्री दहा वाजल्यानंतर क्रीडा संकुलामध्ये कोणत्याही प्रकारचे खेळ होत नाहीत.असे असताना देखील याच क्रीडा संकुलालगतच्या दुसर्या मैदानात रविवारी एक वेगळा कार्यक्रम चालू होता. त्याचा आवाज मोठ्याने येत होता. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता केवळ कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता अकॅडमीवर या त्रासाचा आरोप करण्यात आला जो पूर्णतः चुकीचा आहे, असे क्रीडांगण प्रमुख राहूल पाल यांनी झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

