ठाणे : डोंबिवलीतील स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणाचा गैरवापर

कानठळ्या बसवणाऱ्या लाऊडस्पिकरचा दणदणाट; त्रस्त रहिवाशांची समाज माध्यमांवर तक्रार
डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडांगण
डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडांगण(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये असलेल्या डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडांगणाचा गैरवापर होत असल्याची तक्रार या भागातील त्रस्त रहिवाशांनी समाज माध्यमांवर व्हायरल केली आहे.

Summary

कानठळ्या बसवणाऱ्या लाऊडस्पिकरच्या आवाजाचा रहिवासीच नव्हे तर या भागातील दाट वृक्षवल्लींवर अधिवास करणाऱ्या पशु-पक्षांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्या हेतूसाठी क्रीडांगणाचा वापर व्हायला हवा तो हेतू बाजूला ठेऊन शांतता भंगाचा अपराध आयोजकांकडून केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या संदर्भात डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सविस्तर माहिती सादर केली आहे. मिलापनगरमध्ये डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी असे भव्य क्रिडा संकुल आहे. या संकुलात सर्व प्रकाराच्या खेळांसाठी व्यवस्था उपलब्ध आहे. त्यासाठी वार्षिक/आजीव सभासद शुल्क भरून त्यात सर्व प्रकाराचा खेळासाठी सराव करता येतो. त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क साधारण मध्यम वर्गाला परवडणारे नसल्याने त्याचा उपयोग शक्यतो उच्च उत्पन्न असणारे धनदांडगे लोक करत असतात.

याशिवाय येथे हल्ली क्रिकेट स्पर्धा (Tournament's) होत असल्याने या पर्यावरण अनुकूल असलेल्या भागात शांतता भंग होत असल्याचे दिसून येत आहे. मागील रविवारी पूर्ण दिवसभर आणि रात्री दहानंतर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवरून क्रिकेट स्पर्धेच्या समालोचनासह वक्त्यांची भाषणे सुरू होती. काही स्थानिक रहिवाशांनी विनंत्या करूनही आणि काहीनी पोलिसांकडे तक्रार करूनही आयोजकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हे सर्व सामने डोंबिवलीतील व्यापारी असलेल्या एका समाजाने भरवले होते. काही राजकीय पुढाऱ्यांनी या भव्य कार्यक्रमासाठी पुरस्कृत केल्याचे नंतर समजले. शिवाय खेळाडू, आयोजक, सामने बघण्यासाठी, तसेच समर्थनाकरिता आलेल्यांसाठी जेवणावळीचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.

या भागात मुख्यत्वे रहिवासी क्षेत्र असून मोठी वनराई आणि वृक्षराजी मोठ्या प्रमाणात आहे. या वनराईत विविध तर्‍हेचे पक्षी वास्तव्य करत आहेत. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा कर्णकर्कश आवाज आणि क्रिकेट समर्थकांचा धुडगूस चालू होता. यामुळे या क्रीडांगणाच्या सभोवताली असलेले बंगले आणि सोसायट्यांमध्ये राहणारे डॉक्टर्स, वकील, उद्योजक, नोकरदारांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. तसेच झाडांवर वास्तव्य करणाऱ्या पक्षांनाही याचा फटका बसला असणारच. या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी क्रीडांगण भोवतालच्या रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करून ठेवली होती. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे हे क्रीडांगण पुढील चार महिने शनिवार आणि रविवारकरिता अशाच प्रकाराच्या स्पर्धेसाठी आरक्षित झाल्याचे समजते. म्हणजे हा त्रास पुढेही काही दिवस असाच राहणार असल्याची खंत डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

सदर क्रीडांगण-स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे प्रत्येक वेळी दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने एमआयडीसी देत असते. अर्थात त्याची खरी मालकी एमआयडीसीकडे आहे. भाडेपट्ट्याने देताना एमआयडीसीकडून अनेक कडक अटी आणि शर्ती करारनाम्यात टाकल्या जात असतात. स्थानिक रहिवाशांना चालण्यासाठी (जॉगिंग) व मैदानी खेळ खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात यावे. आजुबाजूला राहत असलेल्या रहिवाशांना त्रास होईल असे कृत्य करू नये. पर्यावरणाला हानी पोहोचेल असे काही करू नये. इत्यादी अशा अनेक अटी आणि शर्ती एमआयडीसीकडून अशा भाडेपट्ट्याने घेतलेल्या भूखंडधारकांना लादल्या असतानाही या फक्त कागदावरच राहिल्या जात आहेत. वास्तविक पाहता नियमांचे उल्लंघन केल्यास भूखंड परत घेण्याचे अधिकार एमआयडीसी प्रशासनास आहेत. काही वर्षापूर्वी एका संस्थेला क्रीडांगणसाठी दिलेला हा अवाढव्य भूखंड एमआयडीसीने अटी शर्ती न पाळल्याने परत घेतला होता. परंतु न्यायालयीन लढ्यानंतर तो त्यांना परत देण्यात आला. निवासी विभागातील असे काही दहा वर्षांकरिता दिलेले भूखंड, भाडेपट्टा मुदत संपल्याने किंवा अटी आणि शर्तींचा भंग केल्याने एमआयडीसीने ताब्यात घेतले आहेत. तेच भूखंड आपल्या विशिष्ट मर्जीतील किंवा राजकीय समर्थकांचा संस्थेला, उद्योजक, शिक्षण संस्थांना देत आहेत. त्यामुळे भविष्यात असे मोकळे भूखंड मोकळेच राहतील की त्यावर आरक्षण बदलून इमारती होतील ? याकडे राजू नलावडे यांनी प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले आहे.

...अन्यथा जनआंदोलन अटळ

डॉ. यू. प्रभाकर राव अकॅडमी क्रीडांगणाच्या गैर वापराबद्दल मिलापनगर रहिवाशांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. मिलापनगर रेसिडेंन्टस वेलफेअर असोसिएशनतर्फे अध्यक्षा वर्षा महाडिक यांनी या संदर्भात एमआयडीसी, पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, लोकप्रतिनिधींकडे स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पत्रव्यवहार करणार आहेत. तरीही हे प्रकार थांबले नाहीत तर मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

गैरवापर करणार्‍या भूखंडधारकांचे भूखंड ताब्यात घेऊन ते स्वतः एमआयडीसीने विकसित करून रहिवाशांना क्रिडा व चालण्यासाठी (जॉगिंग) उपलब्ध करून द्यावेत. एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये असे कोणतेही मुक्त मैदान राहिले नसून सर्व मैदानांवर क्रीडांगणाच्या नावाखाली शाळांचा किंवा खासगी संस्थांचा ताबा असल्याने त्याचा उपयोग केव्हाही सामान्यांना करता येत नाही. एमआयडीसी आणि लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन सचिव राजू नलावडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news