

ठाणे : दिलीप शिंदे हिंदवी स्वराज्य संस्थापक, शौर्याचे प्रतीक, समता, प्रेरणा, आस्थेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी आनंदनगर येथे साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या चौकाचे धर्मवीर आनंद दिघेसाहेब चौक असे नामकरण करण्यात आले. हा सोहळा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
हा पुतळा म्हणजे रायगडवरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृतीआहे. घोडबंदर परिसरातील हा पहिलाच भव्य दिव्य असा छत्रपतींचा पुतळा असल्याने शिवप्रेमी उत्साहीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यावेळी ठाणे पालिका अभियंत्यांनी आनंदनगर येथील रुंदीकरण करण्यात आलेल्या नव्या रस्त्यावर भव्य दिव्य चौकाची निर्मिती केली.
त्या चौकात स्थानिक आमदार तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा किल्ले रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणे पुण्यातील शिल्पकार सुभाष भरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी आठ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली. किल्ल्याचे चार बुरुज बनविण्यात आले असून त्या बुरुजांवर चार तोफा आणि शस्त्रधारी मावळेही बसविण्यात आले आहेत. ३० मीटरच्या चौथऱ्यावरील उभारलेल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे ६ मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिव जयंतीदिनी लोकार्पण करण्यात आले.
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नारळ वाढविले तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराजांना पुष्पहार घालून शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले केले. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच त्या चौकाचे धर्मवीर आनंद दिघेसाहेब चौक असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका अनिता ठाकूर, कार्यकारी अभियंता संजय कदम , उपअभियंता सुदर्शन मोरे, गव्हाणे, माजी परिवहन सदस्य साजन कासार तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, शिवप्रेमी उपस्थित होते.