

शिक्षण हक्क कायदा सांगतो प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे या बरोबर या कायद्यात अनेक बाबींचा समावेश आहे. मात्र आता मोखाडा तालुक्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले असून सगळा कारभार फक्त कागदोपत्री चालल्याचे दिसून येत आहे. सध्या गैरहजर असूनही दुसर्या दिवशी येवुन हजेरी नोंदवण्याचे एक प्रकरण तालुक्यात ताजे असतानाच आता तालुक्यातील केंद्रशाळा आसे या जिल्हा परिषद शाळेचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.
याठिकाणी 1 ते 8 चे वर्ग असून येथे 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यातील गंभीर बाब म्हणजे 15 जुन म्हणजेच शाळा सुरू झाल्यापासून चौथीचा 1, सहावीचे 2, आणि सातवी 2 असे फक्त पाचच विद्यार्थी शिक्षण घेत असून हजर राहत आहेत. यामुळे फक्त शाळाबाह्य विद्यार्थी दिसू नये यासाठी कागदोपत्री पट दाखवला गेला असला तरी या उरलेल्या 51 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय आणि एवढा गंभीर विषय समोर असताना जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था नेमके काय काम करतेय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मुळात एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन मोठया योजना उपक्रम राबवत आहे. पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तर वाचन, लेखन प्रकल्प राबवून प्रत्येक विद्यार्थ्यास वाचता लिहिता आले पाहिजे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि त्यांच्याच तालुक्यातील एकाच शाळेत तब्बल 51 विद्यार्थी फक्त पटावर हजर आहेत. ही गंभीर बाब नाही का ? कारण मुल शाळाबाह्य असणं आणि शाळेत न येता फक्त पटावर असणे हे पण शाळाबाह्य असणच नाही का? हा खरा सवाल येथील व्यवस्थेला हे पालक विचारत आहेत.
मी तात्काळ सर्व शिक्षा अभियान मधील संपूर्ण टीमला पत्र काढले असून उद्या जावून शाळेत न येणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालक भेटी आम्ही घेणार आहोत.
वसंत महाले, प्रभारी गट शिक्षणाधिकारी
तालुक्यातील आसे ही ग्रामपंचायत तालुक्यातील दोन नंबरची मोठी ग्रामपंचायत आहे याठिकाणी भोवाडी, कुंडाचापाडा, करोळी, राउतपाडा, स्वामीनगर, नावळ्याचांपाडा आणि या सर्वांची मिळून आसे प्रमुख गाव येथे ही केंद्र शाळा आहे. यामुळे सदरिल पाड्यावरील शाळेत पहिली ते चौथी किंवा 5 वी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी याच शाळेचा आधार असतो. मात्र जिल्हा परिषद मधील ढासळलेली शिक्षण पद्धती, शाळा उशीरा भरणे, लवकर सुटणे, गुणवत्ता पूर्वक शिक्षण न मिळणे यामुळे येथील ज्या गावात शाळा आहे तिथून ते आसपासच्या गाव पाड्यातील अनेक पालकांनी आपले विद्यार्थी इतरत्र किंवा आश्रमशाळेत टाकले आहेत. यामुळे केंद्र शाळा असूनही येथील एकूण पट फक्त 56 एवढा राहीला.
या शिक्षणाची आबाळ इथेच थांबली नाही. या उरलेल्या 56 मधील फक्त 5 ते 6 विद्यार्थीच शाळेत येतात. बाकी विद्यार्थी आज शाळा सुरू होवून दीड महिने झाले तरीही येतच नाहीत. असा गंभीर प्रकार येथे दिसून आला. मग सक्तीचे शिक्षण देणार्या शिक्षण विभागाने हे विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये दररोज शाळेत यावेत यासाठी काय केलं हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शासन म्हणते एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवू नये मग फक्त एकाच शाळेतील 51 मुले आज शाळेतच येत नाही याला जिल्हा गटशिक्षणाधिकारी पासून शाळेतील शिक्षकांपर्यंत सर्वचं जबाबदार नाहीत काय असा सवाल उपस्थित होत आहे.
मोखाडा तालुक्यात एकीकडे शिक्षक कमतरता आहे मात्र आसे या केंद्र शाळेत फक्त पाच विद्यार्थी शिक्षण घेत असताना तिथे 3 शिक्षक कार्यरत आहेत. यातील एक शिक्षकाचे काही दिवसापूर्वीच निधन झाले मात्र मग काही ठिकाणी 1 ते 4 वर्ग एकच शिक्षक सांभाळत असताना येथे 5विद्यार्थ्यांना 3 शिक्षक कसे शिकवत होते हा संशोधनाचा विषय बनला आहे.
शिक्षणाच्या बाबतीत मी अतिशय गंभीर असून ही गंभीर बाब आहे. मी मोखाडा गट शिक्षणाधिकारी यांना तात्काळ उद्याच्या उदया याठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या असून पट वाढवण्यासाठी प्रयत्न न करणार्या शिक्षकांचां पगार बंद करा, उशीरा शाळेवर आलेल्या शिक्षकांचा निवासी भत्ता बंद करा अशा सूचना दिलेल्या आहेत.
प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर.
या जिल्हा परिषद शाळेकडे अजिबात कोणाचे लक्ष नाही, ही बाब मी गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख अशा सर्वांच्या निदर्शनास आणून दिली मात्र आजवर कोणी भेटही दिली नाही. यामुळे जर जबाबदार अधिकार्यांनाच शिक्षणाचे काही पडलेले नसेल तर पालक तरी काय करतील. शिक्षकांच्या ढासळलेल्या कारभारामुळे या शाळेची अशी अवस्था झाली आहे.
रामदास कोरडे, ग्रामस्थ, आसे