

ठाणे : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक कोंडीमुळे रेल्वे आणि बसेस उशिरा धावत आहेत. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना केंद्रावर कसे पोहचायचे याची. चिंता परीक्षार्थींना लागली आहे. त्यामुळे उद्यापासून सलग तीन दिवस होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करून केली आहे.
आमदार आव्हाड आपल्या पोस्ट म्हणतात, उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.