

देवगड : खोल समुद्रातील मच्छीमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. मात्र प्रतिकूल वातावरणामुळे मच्छीमारी सुरू होण्यास थोडा वेळ लागला. सोमवारी (दि.19) रोजी नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रातील मच्छीमारीला खर्या अर्थाने सुरुवात होणार असून यादृष्टीने नौकामालक व खलाशीवर्ग सज्ज झाला आहे.
दोन महिन्याच्या बंदी कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मच्छीमारीला सुरुवात झाली. मात्र प्रतिकूल वातावरणामुळे काही दिवस मच्छिमारीला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर ठराविक नौका तसेच न्हैय व कांडाळीद्वारे मच्छिमारीला सुरुवात झाली आहे. यांत्रिकी नौकांना काही प्रमाणात कोळंबी तर न्हैय मच्छीमारीला मोरी, छोटे पापलेट व कांडाळीद्वारे मच्छीमारीला बांगडा, सौंदाळे, दोडी अशी मासळी मिळू लागली. मात्र माशाला चांगला दर मिळत नसल्याचे स्थानिक मच्छीमार विकास कोयंडे यांनी सांगितले. सध्या कमी-जास्त प्रमाणात मासळी मिळत असली तरीही मच्छीमारीला म्हणावा तसा वेग आलेला नाही.
अद्याप बर्याच नौका किनार्यावर आहेत. मात्र नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर देवगड बंदरातील 50 ते 60 टक्के नौका खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास सज्ज झाल्या आहेत. किनार्यावर घेतलेल्या नौका पाण्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. खलाशीवर्गही देवगडमध्ये दाखल झाला आहे. समुद्राला नारळ अर्पण करून झाल्यानंतर बहुतांशी नौका समुद्रात मच्छीमारी करण्यास जाणार आहेत. सध्या देवगड बंदर नौकांनी गजबजत आहे. अजूनही ज्या नौका किनार्यावर आहेत त्या पाण्यात घेण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. यामुळे गणेश चतुर्थीनंतर गजबजणारे देवगड बंदर आता नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गजबजू लागले आहे. सध्या एकाच सकाळच्या सत्रात लिलाव सेंटर सुरू आहे.
15 सप्टेंबर नंतर मच्छीमारीला आणखी वेग येईल व दोन्ही सत्रात लिलाव सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थींनंतर व्यापारीवर्गही मोठ्या प्रमाणात देवगड बंदरात दाखल होतील अशी शक्यता विकास कोयंडे यांनी व्यक्त केली. खलाशीवर्गही मोठ्या संख्येने अनंत चतुर्दशीनंतर देवगड बंदरात दाखल होतील व मोठ्या प्रमाणात मच्छीमारीला सुरुवात होईल. सध्या श्रावणमासात कमी-जास्त प्रमाणात मासळी मिळूनही त्याला चांगला दर मिळत नाही. अनंत चतुर्दशीनंतर म्हाळवसामध्ये मासळीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा मच्छीमारांना आहे.