

बदलापूर : बदलापूर पूर्व येथील खरवई एमआयडीसीत बॉयलरचा स्फोट होऊन भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी (दि.5) पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्व येथील रेअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बॉयलरच्या रिऍक्टरचा स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा का जबरदस्त होता की आजूबाजूला दोन ते तीन किलोमीटर परिसरात याचे हादरे जाणवले.
इतकंच नाही तर या कंपनीत असलेल्या लोखंडी शेड आणि वस्तू आजूबाजूला असलेल्या वस्तीतील बैठ्या घरांवर पडून घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. तर याच कंपनीच्या बाजूला असलेल्या माणकिवली गावातील एका चाळीत या रिऍक्टरचे 200 किलो हून अधिकची लोखंडी भाग उडून एका व्यक्तीच्या पायावर पडून या व्यक्तीचे दोन्ही पाय तुटले आहेत. तर महिलेचा एक पाय निकामी झाला असून या प्रकरणात अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे कंपनीतील कुठल्याही कामगाराला किंवा कोणालाही काहीही दुखापत न झाल्याने या कंपनीच्या एकूणच कारभाराविषयी संशय निर्माण केला जात आहे. बदलापूर एमआयडीसीत एका मागून एक स्फोट होत असताना औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांच्या लाचखोरीमुळे बदलापूर शहरातील कामगार आणि नागरिक मात्र स्फोटाच्या उंबरठ्यावर राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कुळगांव बदलापूर अग्निशमन दलाने पहाटे 4:15 वाजता लागलेली आग साडेसात वाजेपर्यंत विझवली. मात्र या स्फोटामुळे एमआयडीसी आणि परिसराच्या आजूबाजूला राहणार्या नागरिकांमध्ये मात्र प्रचंड दहशतीच वातावरण असून एमआयडीसीतील कारखान्यांची नियमित तपासणी व्हावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. मात्र अशा घटना घडल्यानंतर कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग, एमआयडीसी, पोलीसांनी अधिक कठोरपणे नियमांचे अंमलबजावणी करण्याचे मागणी होत आहे.