.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
शरीर तंदुरुस्त व निरोगी राहावे, रोगराई दूर व्हावी आणि पौष्टिकता टिकून राहावी, यासाठी आपण दररोज दूध घेतो. दूध अमृततुल्य मानले जाते. मात्र, हेच दूध विष ठरत आहे. गायी म्हशींना जादा दूध येण्यासाठी बनावट इंजेक्शन, औषधांची विक्री करणार्या टोळीचा भिवंडीत पर्दाफाश केला आहे.
सध्या दुधाचे दर गगनाला भिडले आहे. याचाच फायदा घेऊन गोठ्यांमध्ये झटपट पैसा कमविण्यासाठी बनावट इंजेक्शन व औषधे खरेदी करून जादा दूध काढण्यात येत असतानाच, हीच बनावट इंजेक्शन व औषधे तयार करण्यासाठीच्या कारखान्यासह साठवणूक केलेल्या गोदामावर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. भिवंडीतील रोशनबाग फैजान कंपाऊंडमध्ये विक्री करत असल्याची बाब भिवंडी गुन्हे शाखा घटक -2 पथकाने केलेल्या छापेमारीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान शकील चोटे (28),शाकीब वर्डी (28), शोएब कमालुद्दीन अन्सारी (45), असफी रफिक थोटे (43) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर कारखाना मालक झिशान शहानवाज बर्डी (रा. बापगांव,भिवंडी) हाही सदर गुन्ह्यांत सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 5 महिन्यांपासून ते 5 ऑगस्टपर्यंत पाचही आरोपींनी भिवंडी शहरातील रोशन बाग येथील फैजान कंपाऊंडमध्ये शहजाद मोमीन यांच्या गाळ्यात अनधिकृतपणे गायी-म्हशींना जादा दूध येण्यासाठी औषधे, इंजेक्शन तयार करून त्याची विक्री करीत होते. विशेष म्हणजे या सर्व अवैध प्रकाराचा गोरखधंदा चालवून जनावरांसह ते दुध सेवन करणार्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे 6 ऑगस्ट रोजीवरील 4 जणांवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सहा.आयुक्त राजेश बाबुराव बनकर यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी यांच्याशी संपर्क साधला असता, चार आरोपीना 12 लाख 40 हजराच्या मुद्देमालासह अटक करून सीआरपीसी 41 (1) (अ ) प्रमाणे नोटीस बजावून सुटका करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फरार कारखाना मालकाचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
आरोपींच्या कारखाना व गोदामातून 200 लिटर क्षमतेचे रसायनमिश्रित तयार इंजेक्शन, 2 ड्रम, कागदी पुठ्ठ्याचे 17 बॉक्स, लिक्वीड मिश्रित 195 प्लास्टिकच्या बॉटल, कार्बोलिक क्रिस्टल केमिकलचा 5 लिटरचा 1 कॅन, प्लास्टिकचे 35 लिटर क्षमतेचे 1 कॅन, 200 लिटरचा 2 ड्रम, 35 लिटरचा निळ्या रंगाचा अँसिडिक अँसिडचा 1 कॅन, एक गोणी 95 मिलीच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण 12 लाख 40 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासह सदर गोरखधंदा आरोपी झिशानच्या मालकीच्या कारखान्यात सुरू असल्याचे तपासात उघड झाल्याने त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत ऑक्सिटोसिनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या औषधावर बंदी घातली. आता ऑक्सिटोसिनचा वापर गुरांवरही होतोय. गाई-म्हशींचे जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी हे भयंकर हार्मोन वापरले जातेय. त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळते. फॅमिली फिजिशीयन डॉ. गायत्री देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त काळ अशा दुधाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, मूत्रविकार, थकवा, दृष्टिदोषचा आजार होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काविळीचाही धोका निर्माण होतो. गर्भवती महिलांसाठी देखिल हि बाब धोक्याची आहे. दरम्यान, भिवंडीतील या घटनेने केमीकल तसेच वरील बोगस इंजेक्शन, औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहे. त्याचा अहवाल आल्यावर या गुन्ह्याची व्याप्ती वाढेल.