

भिवंडी (ठाणे ) : भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परंतु अजून निवडणूक प्रचाराची रंगत चढणे बाकी असतानाच भिवंडीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता म्हाडा कॉलनी या भागात खडी टाकून रस्ता बनवण्याचे काम सुरु होते. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील संगम पाडा रोड परिसरात हे काम सुरू असल्याबाबत तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आल्यानंतर भरारी पथक क्रमांक ५ मधील कर्मचारी बिट निरीक्षक हनुमान म्हात्रे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथे रस्ता बनविण्याचे काम करणारे इरफान हबीब अन्सारी व डंपर चालक जाहिरुद्दीन जमीर अन्सारी यांना काम कोण करीत आहे याबाबत विचारणा केली. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या अब्दुल रज्जाक बेग या व्यक्ती कडे बोट दाखवून त्याने काम करण्यास सांगितले असल्याचे भरारी पथकासमोर सांगितले.
त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश यांनी या भागात रस्ता बनवण्याचे काम करण्यास सांगितल्यानचे स्पष्ट केले. आचारसंहिता भरारी पथकाने हे काम बंद पाडून भरारी पथक प्रमुख हनुमान म्हात्रे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात विलास पाटील, मयुरेश पाटील यांसह इरफान हबीब अन्सारी व जाहिरुद्दीन जमीर अन्सारी अशा चार जणांनी रस्त्याचे काम करून मतदार यांना मतदान करावे या उद्देशाने निवडणुक आयोगाची परवानगी न घेता आचार संहिता दरम्यान सार्वजनिक रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करीत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दिल्याने निजामपूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात भा. न्या. संहिता २२३, २८५, लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२३ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान भिवंडीत पहिला गुन्हा
निवडणूक प्रक्रिये दरम्यान भिवंडीत दाखल झालेला हा पहिला गुन्हा असून अजून पुढील काळात अनेक वादंगाचे प्रसंग प्रभाग क्रमांक एक सह अनेक भागात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येणार असल्याने निवडणूक यंत्रणेसह पोलिस प्रशासनास सतर्क राहण्याची गरज असणार आहे.