

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्र अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी म्हणून ओळखली जाते .नव्हेच तर अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये नगरसेवक सहभागी असतात अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असतो.अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांना अनधिकृत बांधकाम करणार नसल्याचे शपथपत्र देण्याचे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.
नगरसेवक म्हणून निवडून येण्यानंतर बहुतांश नगरसेवकांचा व्यवसाय हा बांधकाम व्यावसायिक असा होतो.त्यामुळे आता निवडणून येणाऱ्या नगरसेवकांना बांधकाम व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या उमेदवारी अर्जातील अट क्रमांक 16(5) या नुसार उमेदवाराने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 10 मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888 च्या कलम 16 मधील तरतुदींचे वाचन करून त्यानुसार महानगर पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही.
मी स्वतः अथवा माझी पत्नी/माझे पती अथवा अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 10 (19)/ मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 16(1ड) मधील तरतुदी नुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरेल याची मला जाणीव आहे असे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक केले आहे.हे प्रतिज्ञापत्र उमेदवारी अर्ज भरताना देणे बंधनकारक केल्याने भविष्यातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांना अटकाव करणे प्रशासनास शक्य होणार आहे.